महाराजांची भोगवृत्ती!

वारकरी संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा कणा मानली जाते. ‘मद, मोह, मत्सर यांपासून दूर राहणे’ हा वारकरी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. साधेपणा, समता, नामस्मरण आणि सामूहिकतेतून व्यक्त होणारे अध्यात्म हे या परंपरेचे वैशिष्ट्य आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी या परंपरेला प्रबोधनाची धार दिली. त्यांच्या अभंगांमधून आणि कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय यावर प्रखर प्रहार झाला. म्हणूनच वारकरी परंपरा ही केवळ धार्मिक चळवळ नसून सामाजिक परिवर्तनाची एक मोठी लाट होती; परंतु आजच्या काळात या परंपरेच्या नावाखाली काही विकृत प्रवृत्ती डोके वर काढताना दिसतात. वारकरी संप्रदायाचा मूळ संदेश जिथे आत्मसंयम, विवेक आणि नैतिकता यांवर आधारलेला आहे, तिथे काही कथित कीर्तनकार आणि तथाकथित ‌‘महाराज‌’ भोगवृत्ती, सत्तेची लालसा आणि व्यक्तिपूजेला खतपाणी घालताना दिसतात. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. मुळात हा संप्रदाय विद्रोही वृत्तीचा. अध्यात्माशी नाते ठेवतानाही अंधश्रद्धांवर प्रहार करणारे संत या भूमीने पाहिले. निरुपणकार, कीर्तनकार कसा निर्मोही असावा, याचे वर्णन संत तुकारामांनी केले आहे. ज्या घरी कीर्तन केले, तिथले पाणी, भोजनही नको, अशी त्यांची भूमिका होती; परंतु आजच्या कीर्तनकाराचे हजारोंत मानधन पाहिले, की संत तुकारामांचे अभंग, ज्ञानेश्वरी, रामायण मुखोद्‌गत असलेल्यांनी त्यातील शिकवण मात्र घेतली नाही, असे दिसते. याचा अर्थ घरावर तुळशीपत्र ठेवावे असे नाही; परंतु वाणी याच भांडवलावर लाखोंच्या गाड्या, उंची वस्त्रे, आभूषणे घालून मिरवणाऱ्यांना पैसा, संपत्ती मृतिकेसमान वाटणार नाही, उलट ते तिचे पुजारी झाले आहेत. त्यातच गेल्या काही वर्षांत देशभरातील प्रकरणे पाहिली, की स्वतःला संत, महंत म्हणाऱ्यांचे पाय किती माखलेले आहेत, हे स्पष्ट होते. आसाराम बापूसह अनेकांवर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. कुंटणखाने चालवण्यासारखे आश्रम चालवण्याचे प्रकार उघडकीस आले. त्याग वृत्तीऐवजी भोगवृत्ती आणि विलासी वृत्ती फोफावली. मधुर वाणीखाली काय दडलेले असते, हे लवकर कळत नाही. त्यातही भक्त परिवार त्यांच्या प्रेमात इतका आंधळा झालेला असतो, की बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ही भक्त आरत्या ओवाळण्याचे कमी करीत नव्हते. आसाराबापूला शिक्षा सुनावल्यानंतरही काही शाळांतून त्यांच्या छायाचित्राच्या आणि काही कथित शिकवणुकीच्या वह्या त्याचे समर्थक वाटत होते. बलात्कारी महाराजाची छायाचित्रे असणाऱ्या वह्यांतून मुलांनी काय शिकावे, काय आदर्श घ्यावा, असा प्रश्न पडतो. शिर्डीतील खडेवालेबाबाचे लैंगिक अत्याचार प्रकरण आणि त्याच्याकडे पुत्रदयी अमावस्येला होणारी महिलांची गर्दी, राजकीय कुटुंबातील महिलांचा त्यातील सहभाग हा निश्चितच चिंतादायी प्रकार होता. समर्थकांचा प्रचंड रोष पत्करूनही आम्हीच तो प्रकार उघडकीस आणला होता. अलिकडच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात उघडकीस येणाऱ्या काही घटनांनी समाजमन हादरवून सोडले आहे. अध्यात्म, साधना, कीर्तन, प्रवचन या पवित्र संकल्पनांच्या आड लपून काही कथित ‌‘महाराज‌’ आणि ‌‘बाबा‌’ यांनी उभारलेले साम्राज्य केवळ आर्थिकच नाही, तर नैतिक अधःपतनाचेही प्रतीक बनले आहे. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात याच्याविरोधात महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप, नगर जिल्ह्यातील यशवंत एकनाथ थोरात उर्फ गुंजाळ महाराजावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा आणि या सर्वांमध्ये कथित राजकीय-सामाजिक आश्रयाची चर्चा या सगळ्यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे, तो म्हणजे आपण नेमके कुठे चाललो आहोत? खरात याने आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली महिलांशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या ट्रस्टमधील काही विश्वस्त आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेल्या कथित संबंधांमुळे या प्रकरणाने अधिकच वादळी स्वरूप धारण केले आहे. या संदर्भात काही राजकीय पदांवर असलेल्या व्यक्तींची नावेही चर्चेत आली आहेत. खरात याने सर्वपक्षीय राजकारण्यांशी संबंध होते. त्याच्याकडे सापडलेल्या ५८ व्हिडीओतून आता कोणत्या आणि किती महिलांवर अत्याचार झाले, यावर आता प्रकाश पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक आता त्याचा तपास करणार आहे. राज्य महिला आयोगाला न्यायिक दर्जा आहे. महिलांना न्याय देण्याचे काम या आयोगाने करायचे असते; परंतु वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येपासून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत.

महिला आयोगासारख्या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे महिलांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आहे; पण जर अशा संस्थांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर सर्वसामान्य महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा? न्याय मिळवून देणाऱ्या यंत्रणाच जर संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या, तर पीडित महिलांसाठी परिस्थिती अधिकच क्लिष्ट बनते. नाशिकप्रकरणातील खरात याच्या संस्थेच्या चाकणकर विश्वस्त असणे, खरात याच्यावर त्यांनी छत्री धरणे, त्यांचे पाय धुणे यांसारख्या कृत्यामुळे आपण कुणाबरोबर आहोत, हे याचे भान त्यांना नाही. आता त्या खरात याच्या कृत्याशी आपला संबंध नाही, असे सांगत असतील, तरी एवढे गंभीर गुन्हे असताना त्याच्या संस्थेत विश्वस्त राहूनही त्यांना त्याची माहिती कशी मिळाली नाही, हा प्रश्न पडतो. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशा सर्वंच पक्षांच्या नेत्याचा वरदहस्त असल्याने सामान्य महिलांना लैंगिक शोषण होऊनही तक्रार करण्याचे धाडस झाले नसेल. महिला आयोगाची अध्यक्षच त्याच्याबरोबर असेल, तर महिलांनी आयोगाकडे तरी दाद कशी मागायची, असा प्रश्न आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांनी आता याबाबत ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. नगर जिल्ह्यातील थोरात महाराज प्रकरणही तितकेच धक्कादायक आहे. पारनेर तालुक्यातील ढवळपुरीच्या एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केवळ गुन्हेगारी कृत्य नाही, तर ‌‘संत‌’ या शब्दालाच कलंक लावणारा प्रकार आहे. समाजाने ज्यांना मार्गदर्शक मानले, ज्यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवली, त्यांच्याकडूनच असे प्रकार घडणे ही शोकांतिका आहे. या कथित महाराजाची एक पत्नी त्याला सोडून गेली आहे. दुसरी पत्नी गरोदर आहे. असे असताना एका अल्पवयीन मुलीवर सलग पाच वर्षे अत्याचार करणे, मुलीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे शोषण करणे असे गंभीर प्रकार त्याने केले.

मुलीला चटके देण्याची विकृती जशी त्याच्यात आढळली, तशीच विकृती खरात याच्यातही आढळली. त्यानेही महिलेच्या व्हिडीओचा गैरवापर केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये एक समान धागा दिसून येतो, तो म्हणजे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जमा केलेली संपत्ती. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, भव्य आश्रम, आलिशान जीवनशैली हे सर्व पाहता एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे हे खरेच अध्यात्म आहे का? वारकरी परंपरेतील संतांनी साधेपणाचा, त्यागाचा आणि समतेचा संदेश दिला. मग आजचे हे तथाकथित ‌‘महाराज‌’ इतक्या प्रचंड ऐश्वर्यात कसे जगतात? आणि समाज त्यांना का मान्यता देतो? या पार्श्वभूमीवर देशातील इतर काही कुप्रसिद्ध प्रकरणांची आठवण होते. काही कथित संतांवर गंभीर गुन्हे सिद्ध झालेले आहेत. या घटनांनी हे स्पष्ट केले आहे की ‌‘आध्यात्मिक‌’ चेहरा असणे म्हणजे व्यक्ती निर्दोष असतेच असे नाही. उलट, या मुखवट्याच्या आड अनेकदा भयंकर वास्तव दडलेले असते. समाजातील काही घटक अजूनही या व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवतात. त्यांची पूजा करतात, त्यांना ‌‘देव‌’ मानतात. हा अंधविश्वासच अशा लोकांना बळ देतो. जेव्हा लोक प्रश्न विचारणे थांबवतात, तेव्हा फसवणूक सुरू होते. आणि जेव्हा श्रद्धा विवेकावर मात करते, तेव्हा शोषणाला मार्ग मोकळा होतो. महिलांच्या बाबतीत ही परिस्थिती अधिकच संवेदनशील आहे. मानसिक आधार, कौटुंबिक समस्या, आरोग्याच्या अडचणी या सगळ्यांमुळे अनेक महिला अशा ‌‘गुरूं‌’कडे वळतात; पण तिथेच त्यांचा विश्वासघात होतो. ‌‘उपचार‌’, ‌‘दीक्षा‌’, ‌‘आशीर्वाद‌’ या नावाखाली त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले जाते. ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून, समाजाच्या सामूहिक अपयशाचे लक्षण आहे. या सगळ्या प्रकारांमध्ये राजकीय आश्रयाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अनेक वेळा अशा व्यक्तींना स्थानिक नेत्यांचा पाठिंबा मिळतो. त्यांच्या कार्यक्रमांना राजकीय उपस्थिती असते, निधी मिळतो आणि त्यांच्या विरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आरोपी अधिक बिनधास्त होतात. कायद्याची भीतीच उरत नाही. कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटीही या समस्येला कारणीभूत आहेत. गुन्हे दाखल होण्यास विलंब, पुराव्यांचा अभाव, साक्षीदारांवर दबाव या सगळ्यामुळे अनेक प्रकरणे न्यायालयात टिकत नाहीत. परिणामी, दोषींना शिक्षा होत नाही आणि पीडितांना न्याय मिळत नाही. ही परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजाने जागृत होण्याची गरज आहे. कोणतीही व्यक्ती कितीही प्रभावशाली असली, तरी तिच्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. श्रद्धा असावी; पण ती विवेकाच्या चौकटीत असावी. अंधविश्वास आणि व्यक्तिपूजा यामुळेच अशा घटना घडतात. शिक्षण आणि जागरूकता हा यावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. विशेषतः महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या शंका निर्माण झाल्यास त्वरित तक्रार करणे, कायदेशीर मदत घेणे आवश्यक आहे. भागा वरखडे