मुंबई, २८ सप्टेंबर २०२०: बिहारमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय वातावरणही तापलं आहे. एनडीए आणि यूपीए आघाडीनं एकमेकांच्या विरोधात कंबर कसली आहे. यंदा होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी बिहार निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे.
एनडीएला हरवणं हाच बिहार निवडणूक लढवण्याचा उद्देश
”आम्हाला देशात नवीन राजकारण आणायचे आहे. आम्ही महाराष्ट्र लोकसभेत एआयएमआयएम सोबत युती केली आणि होते, आणि एआयएमआयएमची एक सीट निवडून आली. मात्र पुढे युती तुटली. महाराष्ट्रात जे घडले नाही ते बिहारमध्ये होऊ शकते. बिहार निवडणूक लढवण्याचा उद्देश एनडीएला हरवणं हाच आहे. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
४०% जनसंख्या कोणतंही सरकार पाडू शकते
”बिहारमध्ये मुस्लिम, आंबेडकरी, आदिवासी एकत्रितपणे ४०% लोकसंख्या आहेत. म्हणून लोक एकत्रितपणे कोणतेही सरकार पाडू शकतात, हे सरकार या सर्व नागरिकत्व, आरक्षणाच्या विरोधात आहे. मौलवी, मौलाना,सुशिक्षित मुसलमानांनी याचा विचार करावा. विधानसभा निवडणुकीत आपण हे एनडीएला हरवू शकतो.” असंही आंबेडकर म्हणाले.
अशी होईल बिहार निवडणूक
बिहारच्या २४३ सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यातील ३ नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत संसर्ग टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे