पाकिस्ताननं तोफेतून डागले गोळे, सैन्यातील दोन जवान जखमी, पाकचे पाच सैनिक ठार

7

राजौरी, १२ ऑक्टोंबर २०२०: राजौरी जिल्ह्यातील सुंदरबानी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर रविवारी पाकिस्तानी सैन्यानं जोरदार गोळीबार केला आहे. यावेळी पूंछ जिल्ह्यातील देवगड, खादी व करमाडा येथेही जोरदार गोळीबार करण्यात आला. यात भारतीय लष्कराचे लान्स नाईक आणि बीएसएफचा एक सैनिक जखमी आहे. त्याचबरोबर भारतीय लष्कराच्या प्रतिउत्तरामुळं पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यातील अनेक सैन्य चौकी नष्ट झाली आहेत.

सुंदरबनीतील मल्ला भागात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाक सैन्यानं जबरदस्त शस्त्रास्त्रे घेऊन गोळीबार सुरू केला. दोन तासांपेक्षा जास्त काळ गोळीबार सुरु होता. यात सैन्याचा लान्स नाईक आणि एक बीएसएफ जवान जखमी झाले. दोघांनाही जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता पुंछ जिल्ह्यातील कुंती, करमाडा, कसबा, देवगड, ढोकरी आणि पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरू झाला.

या भागात पाकिस्तान लष्करानं मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. त्यासाठी लांब पल्ल्याच्या तोफांचा वापरही करण्यात आला. मोर्टारचे गोळे देखील डागले आहेत. त्याचवेळी पाकनं पुन्हा सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सुंदरबनी सेक्टर भागात गोळीबार सुरू केला. कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनीही संपूर्ण रात्रभर गोळीबार केला. पाकनं भारतीय हद्दीतील चक चंगा, गुर्जर चक, कांदियाळ खेड्यांना लक्ष्य केलं.

काल भारतीय सैनिकांनी पुंछ जिल्ह्यातील मानकोट सेक्टरमध्ये गोळीबार केल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्यानं आपल्या कारवाईदरम्यान पाकिस्तानच्या चार सैनिकांना ठार मारून पाच पोस्ट नष्ट केल्या. मात्र, या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. शनिवारी मानकोटमधील रहिवासी भागात शेल पडल्यानं अर्धा डझनहून अधिक घरांचे नुकसान झालं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे