आगामी महापालिका निवडणुका; भाजपची ‘विकसित भारत’ कार्यशाळा, विजयाचे रणशिंग फुंकले!

19
BJP Vikasit Bharat Workshop Pimpri Chinchwad
भाजपची 'विकसित भारत' कार्यशाळा;

BJP Vikasit Bharat Workshop Pimpri Chinchwad: आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने पिंपळे सौदागर येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ आणि जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. यावेळी भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र देत, नागरिकांपर्यंत सरकारच्या जनहिताच्या योजना पोहोचवण्याचे आवाहन केले.

भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महापालिका निवडणुका लवकरच होणार असल्याने, नियोजनबद्ध काम करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनहिताच्या योजना मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा आणि ‘विकसित भारता’चे ध्येय साध्य करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा.”

या कार्यशाळेला भाजप जिल्हा प्रभारी वर्षा डहाळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, नितीन काळजे, राहुल जाधव आणि विलास मडेगिरी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “१२ जूनपर्यंत जिल्हास्तरावर प्रदर्शने, संवाद सत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, १६, १७ आणि १८ जून रोजी विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतील.” आमदार शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरत, “यंदाच्या निवडणुका पूर्ण ताकदीने जिंकायच्या आहेत,” असे आवाहन केले. आमदार महेश लांडगे यांनी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, या कार्यक्रमांद्वारे लोकांना सरकारच्या कामगिरीबद्दल माहिती देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यशाळेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजप पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे