Pimpri Chinchwad Industrial Zone Reduction: एकेकाळी जागतिक नकाशावर ‘उद्योगनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकिकाला आता मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यात तब्बल ५५२ हेक्टर औद्योगिक क्षेत्र कमी करण्यात आले असून, वाणिज्यिक क्षेत्रालाही (Commercial Zone) कात्री लावण्यात आली आहे. यामुळे आधीच बदलत्या औद्योगिक धोरणांमुळे आणि करप्रणालीमुळे त्रस्त असलेल्या उद्योजकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार असून, उद्योगांच्या स्थलांतराला गती मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते एच.ए. कंपनीच्या स्थापनेपासून आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण व अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडने औद्योगिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली होती. आज पिंपरी, चिंचवड, भोसरी, तळवडे, ताथवडे या परिसरात ४ हजार ५७९ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह एकूण १२ हजार ५७६ लघुउद्योग कार्यरत आहेत. या कंपन्यांमुळे शहराची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि पिंपरी-चिंचवडची ओळख जगाच्या पाठीवर अधोरेखित झाली होती.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहरातून उद्योगांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच, महापालिकेच्या नव्या विकास आराखड्याने उद्योजकांच्या चिंतेत भर टाकली आहे. १९९७ च्या विकास आराखड्यात १९७६ हेक्टर असलेले औद्योगिक क्षेत्र आता कमी होऊन १४२४ हेक्टरवर आले आहे, म्हणजेच ५५२ हेक्टरची घट झाली आहे. इतकेच नव्हे, तर १९९७ च्या आराखड्यात ६७२ हेक्टर असलेले वाणिज्यिक क्षेत्रही नवीन आराखड्यात १७४ हेक्टरपर्यंत घटवले आहे, ज्यामुळे ४९८ हेक्टर वाणिज्यिक क्षेत्र कमी झाले आहे.
या गंभीर बदलावर लघुउद्योजक तात्यासाहेब सपकाळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. “महापालिकेने जाहीर केलेल्या विकास आराखड्यात औद्योगिक क्षेत्र घटवणे हे उद्योगवाढीच्या धोरणाच्या विरोधात आहे. उद्योगांच्या स्थलांतरामागे शासकीय धोरणे प्रमुख कारण आहेत. एमआयडीसीने लघुउद्योग वाढीचे धोरण राबवायला हवे होते आणि पूरक धोरणांची अंमलबजाणी करायला हवी होती. आराखड्यात उद्योगांचे क्षेत्र कमी करू नये,” असे मत त्यांनी मांडले आहे.
या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडची ‘उद्योगनगरी’ म्हणून असलेली ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. औद्योगिक आणि वाणिज्यिक क्षेत्रातील ही घट केवळ उद्योजकांनाच नव्हे, तर शहराच्या विकासालाही मोठा फटका देणारी ठरू शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे