अमरावती, २० मार्च २०२१: मुंबईतील अँटिलियाजवळ स्कॉर्पिओत स्फोटके सापडल्यानंतर महाराष्ट्रातील अमरावतीतही जिलेटिनच्या स्टिक्स सापडल्या आहेत. अमरावती येथे पोलिसांनी २५ किलो जिलेटिन स्टिक्स आणि सुमारे २०० डिटोनेटर जप्त केले. ते घेऊन जाणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. मात्र, दुसरा आरोपी फरार झाला, ज्याचा शोध सुरू आहे.
अमरावतीच्या तिवसा भागात रात्री उशिरा गस्त सुरू असताना दोन दुचाकीस्वारांना पोलिसांनी पाहिले. ते प्लास्टिकच्या पोत्यात काहीतरी घेऊन जात होते. संशय आल्यावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण दोघे पोलिसांच्या तावडीतून निसटत दुचाकी च्या साह्याने पळून गेले.
त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून एका व्यक्तीला पकडले. दुचाकीवरून प्लास्टिकची पोती फेकून दुसरी व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेली. पोलिसांनी जेव्हा या पोत्याचा शोध घेतला तेव्हा पोलीस आश्चर्यचकित झाले. या प्लास्टिकच्या पोत्यात सुमारे २५ किलो जिलेटिनच्या स्टिक्स आणि २०० हून अधिक डिटोनेटर आढळले. सध्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.
हे सांगितले जात आहे की, हे स्फोटक काही लहान भागात विनाश करण्यासाठी पुरेसे आहे. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक सापडणे धक्कादायक आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नुकतेच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडले. या वाहनातही जिलेटिनच्या स्टिक्स होत्या. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाच्या तपासादरम्यान, अमरावतीकडून जिलेटिनच्या काड्या मिळाल्यामुळे आता अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे