औरंगाबाद, २५ जुलै २०२३: मराठवाडा विभागात या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एकूण ४८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी सर्वाधिक ९२ प्रकरणे जून महिन्यात आहेत. आतापर्यंत केवळ १० कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली आहे. १०० हून अधिक प्रकरणांची चौकशी सुरू आहे, तर ६० हून अधिक प्रकरणे अपात्र आढळून आली आहेत. राज्याच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
जानेवारीमध्ये ६२, फेब्रुवारीमध्ये ७४, मार्चमध्ये ७८ एप्रिलमध्ये ८९, मे महिन्यात ८८ आणि जूनमध्ये ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. महसूल विभागाच्या औरंगाबाद विभागाच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात १२८, उस्मानाबादमध्ये ९० आणि नांदेडमध्ये ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जून महिन्यात ९२ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या असून त्यात बीडमधील ३० आणि नांदेडमधील २४ घटनांचा समावेश आहे.
४८३ प्रकरणांपैकी ३०४ प्रकरणे अनुग्रहासाठी पात्र असल्याचे आढळले, ११२ प्रकरणे तपासाधीन आहेत, तर ६७ प्रकरणे अनुग्रहासाठी अपात्र आढळून आली. आतापर्यंत फक्त १० कुटुंबांना ३०,००० रुपयांची रोख मदत आणि ७०,००० रुपयांची मुदत ठेव केली आहे. बीड या राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा असून, त्यांनी २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड