६ जून १६७४ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ – राज्याभिषेक दिन

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही बहुदा भारताच्या इतिहासातील सगळ्यात अद्वितीय अशी घटना म्हटली पाहिजे. संपूर्ण भारतखंडावर जेव्हा इस्लामी सुलतान थैमान घालत होते त्यावेळी स्वतःचं लहानसेच पण अत्यंत बळकट राज्य निर्माण केलं व कमालीच्या वेगानं ते वाढवलंही. भूमीवर आदिलशाह, मुघल ह्यांच्याशी व समुद्रावर सिद्दी, इंग्रज व पोर्तुगिज अशा चतुरंग सेनांशी युद्ध करत त्यांनी स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्यांनी सारा गोळा करण्याची अत्यंत तर्कशुद्ध पद्धत राबवली, स्वतःची नाणी पाडली व मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी व्यवहारकोशाची निर्मिती करविली. राज्याचा कारभार चालवण्यासाठी राजाच्या हाताखाली काम करणारे अष्टप्रधान मंडळ ही त्यांनी तयार केलं. त्यांच्या या अविश्रांत कार्यामुळे व त्यामागच्या राष्ट्रनिर्मितीच्या मूलभूत संकल्पनेतून मराठा साम्राज्याची पायाभरणी झाली.


एप्रिल १६७४ पर्यंत रायगडावर राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू झाली होती. गागाभट, बाळंभट, रामजीप्रभू चित्रे व इतर बरेच लोक ह्या सोहळ्यासाठी झटत होते. हिरोजी इंदुलकराने गडावर इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकामे हाती घेतली होती.


सेवेचे ठायी तत्पर
हिरोजी इंदुलकर


।। श्री गणपतयेनमः ।।
।। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनु ।।
।। ज्ञया श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।।
।। शाके षण्नव बाणभुमिगणनादानंद संवत्सरे ज्योतिराज ।।
।। मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्प्ये तिथौ ।। १ ।। वापीकूपतडागराजिरू ।।
।। चिरं हर्म्येर्वनंवीथिको स्तंभैः कुंभिगृहैनरेंद्रसदनै ।।
।। र्मिहिते श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजीना निर्मितो ।।
।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।


सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रसाद सिंहासनाधीश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मधे आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, घरे, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, उंच राजगृहे अशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेपर्यंत नांदो.
– रायगडावरील जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख


गागाभट व इतर पुजाऱ्यांनी राज्याभिषेकासाठीचा उत्तम मुहूर्त निश्चित केला – शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, जेष्ठ शुद्ध त्रितीया, शनिवार, सूर्योदयापूर्वी तीन घटका. अनेक मान्यवरांना या समारंभासाठी आमंत्रणे गेली होती. रायगडावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झन्डेन हा या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित दहा हजार पाहुण्यांपैकी एक होता. महाराजांचे सोन्याचे सिंहासन हिरेमाणकांनी सुशोभित केले होते. एकूण ३२ मण सोन्याने हे सिंहासन घडवले होते. दरबारातही सगळीकडे भरजरी पडदे होते. महाराज्यांच्या नौदलाच्या सामर्थाचे प्रतीक म्हणून सिंहासनावर दोन्ही बाजूंना मोठ्या माशांचे चिन्ह होते. तसेच त्याच्या घोडदळाचे सामर्थ्य दर्शविण्यासाठी सोनेरी भाल्यांवर घोड्याच्या शेपट्याही उजव्या हाताला लावलेल्या होत्या. मध्यावर समतोल न्यायदान दर्शविणारी तुळा चिन्हांकित केली होती.


भारतातील सात नद्यांमधून ह्या सोहळ्यासाठी पाणी आणलं गेलं होतं. महाराजांना ह्या सप्तनद्यांनी पवित्र स्नान घातलं जाणार होतं. १६ जून १६७४ ला पहाटे पाच च्या सुमुहूर्तावर महाराजांचा राज्याभिषेक योजला होता.


मुसलमानी सुलतानांच्या राज्यात आतंकित रयतेला यामुळे न्यायाची व सुव्यवस्थेची ओळख होणार होती. महाराजांनी राज्याभिषेकावर अमाप खर्च केला होता. हेन्री ऑक्झन्डेन नावाच्या इंग्रज वकीलाच्या मते तो समारंभ अत्यंत भव्य व दैदीप्यमान होता. याच्या खर्चाचं वृतांत मात्र मेळ खात नाहीत. सभासदाच्या मते यात सहा कोटी रुपये खर्च झाला होता पण ती थोडी अतिशयोक्ती वाटते. वलंदेजांच्या मते त्याला दीड लाख पागोडा इतका खर्च झाला होता. सध्या उपलब्ध असलेली साधने पाहता या समारंभाला साधारण पन्नास लाख रुपये खर्च धरायला हरकत नाही.

तसं पाहायला गेले तर खर्चाचे घटकही बरेच होते – महाराजांनी प्रतापगडावर केलेली दाने, सोन्याचे सिंहासन, सोन्याच्या मोहरांची तुला, ब्राह्मणांना दिलेल्या दक्षिणा, गोर गरीबांना केलेले दान, आमंत्रितांच्या राहण्याची सोय व इतर अनेक खर्च. या खर्चातील काही भाग भरुन काढायला महाराजांनी सिहासनपट्टीनावाचा नवा कर काही वतनदारांवर लावला होता. दापोडीच्या एका देशमुखाने सिहासनपट्टीसाठी एक हजार होन दिल्याचं कळतं.

संदर्भग्रंथ:
राजा शिवछत्रपती पृष्ठ ६९०-६९९, ७१७
छत्रपति शिवाजी पृष्ठ २४१

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा