अभिजीत बॅनर्जी यांच्याशी होणार आज राहुल गांधीची चर्चा

नवी दिल्ली, दि. ५ मे २०२०: कोरोना विषाणूमुळे झालेला विध्वंस आणि देशातील लॉकडाऊनमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीबाबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मंगळवारी सकाळी ९ वाजता नोबेल पारितोषिक विजेता अभिजित बॅनर्जी यांच्याशी चर्चा करतील. यापूर्वी राहुल गांधींनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशीही चर्चा केली होती.

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनबाबत राहुल गांधी हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सतत हल्ले करत आले आहेत आणि सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे करत आले आहे. आता या भागात राहुल गांधी नोबेल पारितोषिक विजेत्या अभिजीत बॅनर्जी यांच्यासमवेत मंगळवारी कोरोनासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे होणारी आर्थिक हानी व सरकारी धोरणांवर चर्चा करू शकतात.

यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी याच आव्हानांवर चर्चा केली होती. या चर्चेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर मोठे प्रश्न उपस्थित केले.

देशातील लॉकडाऊन मुळे २४ मार्चपासून सर्व काही बंद आहे, ज्यामुळे दररोज मोठे नुकसान होत आहे , तथापि लॉकडाऊनचा तिसरा टप्पा काही शिथिलतेसह सुरू झाला आहे. भारतातील अर्थव्यवस्था आणि नोकर्‍या याबद्दल आधीच चिंता आहे. आता कोरोना संकटासह हि चिंता अजून वाढली आहे.

गेल्या महिन्यात भारतीय वंशाचे ३ मोठे अर्थशास्त्रज्ञ आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन आणि नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी एका लेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या.

कमी चाचण्या घेण्यावर प्रश्न:

त्यानंतर राहुल गांधींनी कोरोना टेस्टिंगबाबत प्रश्न विचारला. यावर रघुराम राजन म्हणाले की, जर आपल्याला अर्थव्यवस्था उघडायची असेल तर चाचणीची क्षमता वाढवावी लागेल. आपल्याला सामूहिक चाचणीकडे जावे लागेल. अमेरिकेचे उदाहरण घ्या. एका दिवसात दीड लाखांपर्यंत चाचण्या होतात. परंतु तेथील तज्ञ, विशेषत: संक्रमित आजारांवरील तज्ञांचा असा विश्वास आहे की ही क्षमता तिप्पट वाढवणे आवश्यक आहे, म्हणजेच, जर दररोज ५ लाख चाचण्या केल्या गेल्या तर आपण लॉकडाऊन उघडण्याचा विचार करू शकतो.

सत्तेच्या केंद्रीकरणावर प्रश्न:

राहुल गांधींनी रघुराम राजन यांना प्रश्न विचारले की सत्ता केंद्रीकृत झाली आहे का, ज्यामुळे वाटाघाटी जवळजवळ थांबल्या आहेत. चर्चा आणि संवादातून बर्‍याच समस्या सुटतात. त्याला उत्तर देताना राजन म्हणाले की विकेंद्रीकरण केवळ स्थानिक माहिती उघड करण्यासाठीच नाही तर लोकांना सक्षम बनवण्यासाठीही महत्वाचे आहे.

नोकर्‍यांवर परिणाम:

या कोरोना संक्रमणाचा रोजगारावर काय परिणाम होईल? , असा सवाल राहुल गांधी यांनी केला. त्याला उत्तर देताना राजन म्हणाले की, ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. सीएमआयईच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोरोना संकटामुळे जवळपास १० कोटी लोक बेरोजगार होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा