हडपसर: कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे मागील ५७ दिवसांपासून देशात लॉकडाऊन असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात बरीचशी शिथिलता आणली आहे. उद्योग व्यवसाय दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. राज्य आणि परराज्यातील मजुरांना गावी पाठविण्याचे काम सुरू आहे. मात्र उद्योग व्यवसाय सुरू झाल्यामुळे मजुरांची चणचण भासू लागली आहे. विशेष म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये कुशल आणि अकुशल मजुरांची मोठी गरज भासते व बांधकामावर काम करणारा वर्ग परराज्यातील म्हणजे यूपी, बिहार, एमपी, मधील जास्त आहे. तो गावाकडे धूम ठोकत आहे त्यांना कसे थांबवायचे असा प्रश्न बांधकाम व्यावसायिकांपुढे उभा ठाकला आहे, बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब मालुसरे म्हणाले की अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आता मजुरांना गावी जाण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांची राहण्या-खाण्याची सोय करण्याची तयारी दर्शविली आहे.
काहींनी परराज्यातील मजुरांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना धीरही देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मागील दोन महिन्यांपासून अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांनी मजुरांची व्यवस्था केली होती. त्यानंतरही मजुरांनी घरचा रस्ता धरल्याने या मजुरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन, फुरसुंगी, मांजरी, मुंढवा, वाघोली, आदी परिसरात बांधकाम व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी काही मजुरांना थांबवले आहे. त्यांची जेवणाची, किराणा आणि इतर अत्यावश्यक सुविधा दिल्या जात आहेत. मात्र कोरोनाच्या महामारीच्या भीतीने अनेक मजुर त्यांच्या घराकडे जाण्याचा हट्ट करीत आहेत. व मजूर म्हणतात आम्हाला काहीही करून गावाला जायचे आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात बांधकाम व्यवसायातील साहित्य, कच्चा माल नसल्याने मजुरांची इच्छा असूनही काम करता येत नव्हते. मात्र लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात शिथिलता आणल्यानंतर मात्र परराज्यातील मजुरांचा प्रश्न भेडसावू लागला आहे.
मजुरांना रोखण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. सर्वतोपरी मदत करत आहोत. बांधकाम व्यवसायाशी सलग्न असलेल्या इंटेरियर डिझायनरचीसुद्धा अवस्था बिकट होत आहे. आम्ही विविध कंत्राटे घेतली आहेत. लॉकडाऊन उठताच ती कामे सुरू होतील असे मजुर वर्गाला सांगितले जात आहे. मात्र कोरोनाची भीती आणि भविष्यात रोजगार मिळेल की नाही या भीतीने मजुरांना घरी जाण्याची घाई झाली आहे. आम्ही परराज्यातील मजुरांच्या कुटुंबियांशीही सातत्याने संपर्क साधत आहोत. त्यांची काळजी घेत असल्याचे व त्यांना रोजगाराचे पैसे देण्याचेही आश्वासन देत आहोत तरीसुद्धा काही मजूर ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या धसख्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी मजुरांची साईटवरच राहण्याची सुविधा केली आहे. व आता त्यांना भाडे देऊन उपलब्ध जागेत राहण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली जात आहे. भविष्याचा विचार केला तर लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढू शकते. त्यामुळे मजुरांना किती दिवस सांभाळायचे असा प्रश्नही अनेकांसमोर उभा ठाकला आहे. व संधीचा फायदा उठवावा.
आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात उद्योग-व्यवसाय आणि कंपन्या बांधकाम व्यवसाय सुरू होत आहेत. काही ठिकाणी मजुरांची गरज पडणार आहे. या संधीचा स्थानिकांनी फायदा घेतला पाहिजे. तरुणाईने नव्या जोमाने काम करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. असे बाळासाहेब मालुसरे यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे