तेंव्हाचे शेर आता ढेर-उद्धव ठाकरे

मुंबई : आमच्यासमोर राजकीय विरोधक कोणीच नाही. काँग्रेस पक्ष थकला आहे, अशी कबुली खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. बरोबर आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष ‘खाऊन खाऊन’ थकले आहेत. काँग्रेसमध्ये एक काळ असा होता की त्यांच्या नेत्यांची नावं घेतली जायची. आता मात्र काँग्रेसवाल्यांमुळे शरमेने मान खाली जाते. राष्ट्रवादीचे तर काय चालले आहे तेच कळत नाही. निवडणुकीनंतर त्यांच्याकडे जे काही नेते उरले असतील तेही आमच्याकडेच येतील,’ अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दाेन्ही काँग्रेसचा समाचार घेतला. तसेच आता महिनाभरात अयोध्येतही दिवाळी साजरी करू, असे सांकेतिक वक्तव्यही त्यांनी केले.

मुंबईच्या वांद्रे येथील बीकेसीतील मैदानात महायुतीच्या प्रचाराची सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र माेदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या प्रचारातील ही शेवटची सभा हाेती. त्यात हे नेते काय बाेलतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप-शिवसेनेचे नेते आणि सर्व उमेदवार उपस्थित होते.

ठाकरे पुढे म्हणाले, ‘काँग्रेसने स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यावेळी त्यांचे नेते मोठी व्यक्तिमत्त्वे होती, त्यांच्याविषयी आदर वाटायचा. परंतु आज त्यांच्याकडे असलेल्या नेत्यांची नावे घेतली की मान शरमेने खाली जाते. या पक्षाला पूर्वी विचार हाेता, आता त्यांच्याकडे विकार आला आहे. ते सत्ताभक्षक झाले आहेत. भाजपने जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करू, असे म्हटले. मी त्याचे स्वागत करतो. मात्र काँग्रेस याचा विरोध करीत आहे. सावरकरांना पळपुटे म्हटले जात आहे. त्यांना सावरकर कळलेच नाही. राहुल गांधीच पळपुटे झालेत,’ अशी टीका त्यांनी केली. गेल्या ५ वर्षात महायुतीने महाराष्ट्रात मजबूत आणि काम करणारे सरकार दिल्याचा दावा त्यांनी केला.

‘याच लहान मुलाने तुम्हाला चीत केलंय’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, शरद पवार म्हणतात, आम्ही लहान मुलांशी लढत नाही, परंतु या लहान मुलानेच गेल्या पाच वर्षांत प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला चीत केले आहे. लहान असलो तरी वस्ताद आहोत. आज शरद पवार यांची अवस्था ‘शोले’मधील जेलरसारखी झाली आहे. त्यांच्यासोबत राहायला कोणीच तयार नाही. ईडीला घाबरत नाही, असे म्हणत नखे कापून शहीद होण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत. राष्ट्रवादीला अनुकंपा तत्त्वावर मते मागावी लागत आहेत. ही राष्ट्रवादी नाही तर भ्रष्टवादी पार्टी आहे,’ अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा