अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी १८६२-६३ मध्ये गुलामगिरी वर्णभेदाच्या विरोधात कायदा करून अमेरिकेत होणा-या कृष्णवर्णीय लोकांविरूद्धच्या अन्यायाची ही पद्धत बंद केली. त्यासाठी त्यांना १४ एप्रिल १८६५ रोजी स्वत:चा जीव ही गमवावा लागला, या गोष्टीला आज जवळपास १५५ वर्षे झाली , पण या इतक्या वर्षानंतर ही या कृष्णवर्णीयांच्या बाबतीतला राग गौरवर्णीयांच्या मनात इतका आहे की ते कोठे संधी मिळेल तिथे तो राग व्यक्त करतात.
जॉर्ज फ्लॉइड यांची हत्याही याच रागातून झाली असावी कारण ज्या पद्धतीने जॉर्जला पोलिसांकडून मारण्यात आले ( शेवटी पोलीस ही माणूसच असतो ) यावरूनच त्यांच्या मनातील राग कसा बाहेर पडला हे दिसते. नाहीतरी या टोकाला जाण्याचे कारण हि नव्हते, बरे त्यांनी काही गुन्हा केला ही असेल त्याला शिक्षा देण्यासाठी अमेरिकन न्यायव्यवस्थाही सक्षम आहे मग पोलिस अधिकाऱ्याचा इतका कोणता त्याच्यावर राग होतो ?
अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेल, मार्टिन ल्युथर किंग या नेत्यांनी उभी हयात गुलामगिरी, वर्णभेद, जातीयता कमी करण्यासाठी घालविली.नेल्सन मंडेला सारख्या नेत्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये जवळपास त्यांच्या उमेदीचे २७ वर्षे तुरुंगात घालवावी लागली, मार्टिन ल्युथर किंग सारख्या नेत्यालाही वर्णभेदाच्या चळवळीत सक्रिय होऊन मोठे आंदोलन उभे केले त्यामुळे ४ एप्रिल १९६८ ला गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली इतक्या महान व्यक्तींनाही या लढ्यामध्ये स्वतःच्या जीवाची आहुती द्यावी लागली, पण या सर्व गोष्टींनी सुद्धा जातीव्यवस्था किंवा वर्णभेद हा तसूभरही कमी झाला नाही. तरी तो वाढतच आहे याचे उदाहरण म्हणजे जॉर्ज फ्लॉइडची हत्या .
जॉर्जची हत्या हि सोशल मिडिया व प्रसार माध्यमांमुळे जगासमोर आली, पण असे असंख्य जॉर्ज वर्णभेदाच्या शिकार होऊन आपापल्या थडग्यांमध्ये चिरनिद्रा घेत आहेत त्यांचे काय?
जातीयतेची दरी कमी होत आहे असे वाटत असताना असा प्रकार घडला की ती पुन्हा रुढावते की काय असे वाटते, पण असे प्रकरण हे जगासमोर येते त्यावेळी खात्रीने वाटते किती ती दरी रुंदावलेलीच आहे. एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत यांची मजल जाते याचा अर्थ काय? तो इतका मोठा असू शकतो का ? आता जो राग आहे तो कसला आहे ?
५० वर्षांपूर्वीपर्यंत हा समाज
दारिद्रयात, गुलामगिरीत आयुष्य व्यतीत करत होता तोच समाज शिक्षणामुळे कायद्याच्या आधारामुळे आज समाजात ताठ मानेने जगत आहे. या समाजाने लाथाडलेली गुलामगिरी असेल किंवा त्यांची आर्थिक व सामाजिक जी प्रगती झाली आहे, याच गोष्टींचा राग यदाकदाचित मनात असू शकतो त्यामुळे वर्णभेदाची जागा आता द्वेषाने घेऊन ती हत्या करण्यापर्यंत या श्वेतवर्णीयांची मजल गेली आहे का?
याची नक्कीच विचार करण्याची गरज आज संपुर्ण जगाला आहे.
अशोक कांबळे.