पुरंदर मधील चेकपोस्ट नाक्यावरील शिक्षकांच्या नियुक्त्या अखेर रद्द

पुरंदर, दि. १४ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील विविध चेक नाक्यावर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या नेमणूक अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र इतर ठिकाणी नेमणूक केलेल्या शिक्षकांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी कायम ठेवले असून त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीला मदत करावी लागणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामसमिती सोबत सर्वेक्षण करणे व त्याचे अहवाल वेळोवेळी वरिष्ठांकडे पाठवण्याचे काम त्यांना करावेच लागणार आहे.

पुरंदर तालुक्यात दि.११ रोजी रात्री चेक पोस्टवर ड्युटीवर जात असताना एका शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता. यानंतर शिक्षकांच्या चेक पोस्टवरील नेमणुका रद्द करा अशी सूचना पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केली होती. त्याच बरोबर शिक्षक संघटनांच्यावतीने सुद्धा चेक पोस्ट वरील ड्युटी रद्द करा अशी मागणी करण्यात आली होती. लवकरच शाळा सुरू होत आहे आणि तत्पूर्वी शिक्षकांना थोडा आराम मिळावा म्हणून त्यांना कोरोनाच्या विविध कामातून मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली होती.

मात्र इतर नेमणुका कायम

काल पुरंदरचे तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी केलेल्या चर्चेनंतर चेक पोस्ट वरील शिक्षकांच्या नेमणुका रद्द केल्या, मात्र इतर सेवेत असलेल्या मुख्याधिकारी सासवड, जेजुरी व गटविकास अधिकारी यांचेकडे तपासणी कमी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचऱ्यांच्या नियुक्त्या कायम राहणार आहेत. पुरंदर तालुक्यातील माध्यमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच मुख्यालयी रहाणे आवश्यक आसून त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात ग्रामसमिती बरोबर समन्वय ठेऊन गावात बाहेरून आलेल्या, विलगीकरणात ठेवलेल्या व गावातील नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांच्या मध्ये कोविडची लक्षणे अढळल्यास केंद्र प्रमुखांमार्फत वरिष्ठांना कळवण्याचे आहे. असे दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, केंद्र प्रमुख राजेंद्र कुंजीर, पुरंदर तालुका प्राथमिकसंघटनेचे अध्यक्ष गणेश लवांडे. या पदाधिकऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. या सर्व पदाधिकारी यांचे पुरंदर तालुका माध्यमिक व प्राथमिक संघटनेच्यावतीने व सर्व पुरंदर तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा