पुरंदर, दि. १७ जून २०२० : कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे बंद ठेवली आहेत मात्र असे असले तरी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी राज्यातून अनेक नवविवाहित जोडपी जेजुरीत दाखल होत आहेत. मंदिर बंद असले तरी पहिल्या पायरीचे दर्शन घेत आहेत. पोलिस प्रशासनाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर ही यामध्ये कोणताही फरक पडल्याचे दिसून येत नाही.
जेजुरीचा खंडोबा हे बहुजनांचे कुलदैवत म्हणून ओळखला जातो. अनेक नवविवाहीत आपल्या आयुष्याची सुरुवात ही खंडोबाच्या दर्शनाने करतात. सध्या कोरोना महामारी सुरू असली तरी शासनाने लोकांना विवाह करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात विवाह होत आहेत. विवाह झाल्यानंतर जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेण्याची प्रथा पाळण्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणाहून हे नवविवाहित जेजुरीत येत आहेत. त्यातच पुरंदर तालुक्यात सध्या कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्याचबरोबर याठिकाणी काही व्यावसायिक चोरून धार्मिक विधीच्या साहित्याची विक्रीही करत आहेत.
बाहेरून येणारे हे नवविवाहीत जोडपे त्यांच्याबरोबर आलेले लोक कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर करीत नाहीत. या अनेकांच्या तोंडाला मास्क ही
लावलेला नसतो. सोशल डिस्टन्सचे सुद्धा पालन केले जात नाही. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो असे म्हणत जेजुरीकरांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच नगरपरिषद या सर्वांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर प्रशासने योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
पालिकेच्यावतीने मात्र येथे येणाऱ्या लोकांना जेजुरीत देवदर्शनासाठी न येण्याचे आवाहन करण्यात येते आहे. त्याच बरोबर येणाऱ्या भाविकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात येत आहे. तरी देखील अनेक नवविवाहीत जोडपे जेजुरी मध्ये येत आहेत आणि पुढील काळात हीच मोठी डोकेदुखी प्रशासनासमोर उभी असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे