पिंगोरी (पुरंदर), दि. २१ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील सैनिक व पोलिसांचे गाव अशी ओळख असलेल्या पिंगोरी येथील पुनम शिंदे याची विभागीय पोलीस अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकाल मध्ये त्यांची निवड झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी पदासाठी त्यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे.
पूनम शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या पिंगोरी या मूळगावी आनंदाचे वातावरण आहे. गावातून तसेच तालुक्यातून त्यांच्यवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पूनम शिंदे या सध्या जेजुरी नगरपरिषदेच्या सीओ म्हणून काम करीत आहेत. त्यांनी यापूर्वी सुध्दा स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. २०१४ साली झालेल्या परीक्षेत त्यांची चीफ ऑफिसर म्हणून निवड झाली. अनेक महिन्यापासून त्या जेजुरी नगरपरिषदेत काम करीत असताना त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला आहे. पुनम शिंदेंचे माहेर हे सातारा जिल्ह्यातील बावधन येथील आहे. तिथेच त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालं. तर त्यांची आई अनुराधा व वडील मोहन मुरलीधर कदम यांनी त्यांना नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचे चुलत सासरे नारायण शिंदे हे सुध्दा उपविभागीय पोलिस अधिकारी होते. त्यांचे सख्खे सासरे अँड. नंदकुमार बाबुराव शिंदे हे सासवड न्यायालयातील निष्णात वकील म्हणून ओळखले जातात. त्याचे पती अँड. विशाल नंदकुमार शिंदे हे सुध्दा वकील आहेत. त्यांना शासकीय नोकरीतील उच्च पदावर काम करण्याचा वारसा लाभला आहे. त्यातच त्यांच्या मेहनती स्वभावामुळे त्यांना त्यांच्या सासूबाई शैलजा शिंदे या नेहमीच पाठिंबा देत असतात. २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यांच्या या यशाने पिंगोरीं येथील तरुण तरुणींना प्रेरणा मिळणार आहे. अशा या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा गावाला नेहमीच अभिमान राहील असे म्हणत पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे व सरपंच विद्या यादव यांनी त्यांचे कौतुक केले.
आपल्या या यशानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाल्या की, महिलांनी पोलीस अधिकारी पदावर काम करायला हवे. अशा या पदाच्या माध्यमातून आपण महिलांना योग्य न्याय मिळवून देवू शकतो. स्पर्धा परीक्षा म्हणजे खडतर प्रयत्न करावेच लागणार. सुरवातीला जरी अपयश आले तरी त्यामुळे खचून न जाता त्या प्रयत्नात राहिलेल्या उणीव दूर केल्यात यश हमखास मिळतेच.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे