मुंबई, ४ जुलै २०२० : गेली ५५ वर्षे आपल्या जादुई स्पर्शाने अक्षरे जिवंत करणारे “अक्षरशहा” “अक्षरांचे बादशहा ” मुंबईचे जेष्ठ कलावंत कमल शेडगे यांचे आज दुःखद निधन झाले..! पुढील कित्येक काळ कला क्षेत्रात त्यांचे नाव अजरामर राहील इतके मोठे काम त्यांनी करून ठेवले आहे…!
नाट्यसृष्टीचे पान त्यांच्या शिवाय हलायचे नाही. अगणित अशी मराठी नाटके आणि चित्रपटांची शिर्षकाक्षरे त्यांनी सजविली. नाटकांची अक्षरे इतकी प्रभावी आणि अर्थपूर्ण असत की सम्पूर्ण नाटकच त्यातून डोकावत असे. एखाद्याच्या परिसस्पर्शान त्या गोष्टीचं सोनं होतं अशी कलेची ईशवरदत्त देणगी त्यांना लाभली होती.
दररोज आपल्या नजरेला पडणारे कालनिर्णय,सामना,अक्षर,माहेर,अमृत,महाराष्ट्र टाइम्स (जुने)असे लोगो ही त्यांचीच निर्मिती आहे.अनेक जुन्या जमान्यातल्या गाण्याच्या रेकॉर्ड प्लेअरवरील कव्हर्स तसेच अनेक मराठी पुस्तकांची मुखपृष्ठे , लक्षवेधक नाटकांच्या जाहिराती त्यांच्या सुंदर अक्षरांनी सजली.
महाराष्ट्र टाइम्सच्या साहित्य पुरवण्या मधील सजावटींनी रसिकांना भुरळ घातली , आमच्या सारख्या अनेक कलावंतांनी त्यांची प्रसिद्ध झालेली अक्षरे पाहून एकलव्यासारखी त्यांच्या पासून प्रेरणा घेतली. २५ वर्षांपूर्वी मोहन वाघांच्या “चंद्रलेखा” प्रकाशित ‘ऑल द बेस्ट’ नाटकाच्या जाहिराती आम्ही व्यंगचित्रांच्या माध्यमातून केलेल्या होत्या त्यासाठी शेडगे सरांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेला “नाट्यदर्पण पुरस्कार ” आम्हाला मिळाला होता असे सोलापूरच्या रविकरण पोरे यांनी सांगितले. त्या कार्यक्रमात त्यांच्या भेटीचा आम्हाला योग आला होता त्यावेळी त्याने आमचे कौतुक केले,आशीर्वाद दिले हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
असा अत्यन्त साधा, निगर्वी , प्रेमळ मनाचा अक्षर तपस्या करणारा थोर योगी, कलावंत आज आपल्यातून निघून गेला ! अशा या “अक्षर सम्राटाला” भावपूर्ण आदरांजली .
न्यूज अनकट प्रतिनिधी