मुंबई, दि. १२ जुलै २०२०: कोविड -१९ संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. या दरम्यान राज्यातील सर्वच उद्योगधंदे व सरकारी संस्था अंतर्गत चालू असलेली कामे देखील बंद ठेवण्यात आली होती. यात एसटी चा देखील समावेश होता. टाळेबंदी च्या दरम्यान एसटीच्या सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिवसाला मिळणारे २२ कोटी रुपये उत्पन्न बंद झाले. मात्र यादरम्यान मुंबई, ठाणे, पालघर विभागांतर्गत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी एसटी सेवा सुरू ठेवली तसेच कामगारांसाठी देखील एसटी चालवण्यात आल्या. असे असले तरीही या दोन्ही सेवा मोफत देण्यात येत होत्या त्यामुळे यातून एसटीला कोणताही महसूल मिळाला नाही.
तर नुकतीच तालुका ते गाव ते तालुका एसटी सुरू करण्यात आली. टाळेबंदी आणि कोविड -१९ ची भीती नागरिकांच्या मनात असल्यामुळे याला देखील फारसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळाला नाही. त्यामुळे एसटी महामंडळ आता टाळे बंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन देणे इतके सुद्धा पैसे नसल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे. यासाठी महामंडळाने राज्य सरकारकडे ४५० कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्याचे ठरविले आहे.
वेतनाचा प्रश्न गंभीर
परिणामी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा वेतन प्रश्न आणखीन गंभीर झालेला दिसत आहे. एसटीतील एक लाख कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे फक्त ५० टक्केच वेतन मिळाले. प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन होत असतानाही जून महिन्याचे जुलै महिन्यात मिळणारे वेतन अद्यापही झालेले नाही. वेतनाबरोबरच दैनंदिन खर्च भागवण्यासाठी महामंडळाने सरकारकडे आर्थिक मदत मागण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ४५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शासनाकडे मागितली जाणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
पुढच्या आठवड्यात अजित पवारांसोबत बैठक
एसटीच्या आर्थिक अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यात कर्मचाऱ्यांचा वेतन प्रश्न समोर उभा राहिला आहे. एसटीला दैनंदिन खर्च देखील भागवावे लागतात यासाठीदेखील आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन एसटीला मदत देण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. एसटीचा दैनंदिन खर्च पाहता एसटीला नेमकी किती मदत होईल यावरच चर्चा करून निर्णय होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी