मेळघाटातुन जाणारा अकोला-खंडवा प्रस्तावित रेल्वे गेज बदलून ब्रॉडगेज करू नये व जर करणार असेलच तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून मार्ग न करता तो मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून घ्यावा अशा आशयाची विनंती माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली गेली आहे. व ती योग्यच आहे मेळघाट व्याघ्रप्रकल्पात मोठ्या प्रमाणावर वाघांचा सहवास आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पात कोणत्याही मानवनिर्मित रहदारी किंवा घुसखोरी नाही, आहे त्या कारणाने व्याघ्र प्रकल्पात वाघांचा मुक्त संचार आहे. मेळघाटात सर्व ठिकाणी कच्चे रस्ते असल्याने मानवाचा हस्तक्षेप ही कमी आहे .जर रेल्वेमार्ग झाला तर वाघांच्या रहदारीचा मार्ग अडवला जाण्याचा धोका आहे. अगोदरच देशातील वाघांची संख्या चिंताजनक आहे त्यातच रेल्वे मार्गामुळे वाघ मृत्यू मुखी पडण्याचा मोठा धोका उत्पन्न होऊन वाघांच्या सहवासाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
रेल्वेने अकोला ते खंडवा या १७६ किमी रेल्वे मार्गाचे आधुनिकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यातील जवळपास २४ किलोमीटरचा मार्ग हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार आहे त्यालाच मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून न जाता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची विनंती केली गेली आहे. देशात १९७३-७४ ला जाहीर झालेल्या व्याघ्र प्रकल्पात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा क्रमांक हा खूपच वरचा आहे. मेळघाटातील चिखलदरा व धारणी असे दोन्ही आदिवासी तालुक्यासह आजूबाजूची मिळून २७६८ चौरस किमी क्षेत्रावर प्रकल्प आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन व्याघ्रप्रकल्प वाचवण्याचा जो प्रयत्न करत आहे तो अतिशय चांगला आहे. जर ब्रॉडगेज मार्ग निर्माण झाला तर रेल्वेचा वेग वाढेल व व्याघ्र प्रकल्पातील सर्व प्राण्यांना या मार्गावरती जीवित हानी होण्याची शक्यता आहे. विकास झाला पाहिजे पण प्राण्यांच्या जीवाला धोका होईल असा विकास पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक होऊ शकतो. महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चांगला आहे .
त्याचबरोबर पश्चिम घाटात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी भागातील २९५३ हेक्टर जमीन अधिग्रहण करून ‘ तिलारी संवर्धन राखीव’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ही आता वाघांना मुक्त संचार करताना कोणतीही अडचण येणार नाही. कोयना ,चांदोली, राधानगरी, भुदरगड, तिलारी हा परिसर टायगर कॉरिडोर म्हणून ओळखला जातो व पुढे ते चंदीगड किंवा चोरला मार्गावरून कर्नाटकात जातो. २०१४ च्या व्याघ्रगणने नुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ४ वाघ कॅमेरामध्ये टॅप झाले होते. तिलारी तील जागेमुळे वाघांना संचार करणे सोयीचे होईल.
मेळघाट सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विषयी महाराष्ट्र शासनाने जी आपुलकी व जिव्हाळा दाखवला आहे त्यामुळे वन्य प्रेमींच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. व त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागतही केले आहे.