मंचर, दि. ७ ऑगस्ट २०२०: कोरोनाचा काळात लोक एकमेकांपासून दुरावत जात आहेत. अश्याच काळात आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील सरपंच दत्ता गांजाळे यांनी माणुसकी दाखवत आज सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पार पाडल्याचे दिसून आले.
मंचर मधील एक दाम्पत्य सध्या कोरोना पीडित असून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यानां दोन लहान मुले आहेत. आई वडील दोघेही हॉस्पिटलमध्ये असून कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ह्या दोन लहान मुलांना कोरोना टेस्ट साठी घेऊन जाण्यास कोणीही तयार होत नव्हते. आणि टेस्ट करणे अत्यंत गरजेचे होते, ॲम्बुलन्स मध्ये बसण्यास ही दोन मुले घाबरत होती.
त्यामुळे त्यांचा आई वडिलांनी गावचे सरपंच यांना कॉल करून विनंती केली, सरपंच दत्ता गांजाळे यांनी स्वतःच्या टू व्हिलर वरून त्या दोन्ही मुलांना लगेच कोणताही विचार न करता उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तिथे जाऊन दोन तास त्या मुलांसोबत रांगेत उभे राहून त्यांची टेस्ट करून घेतली.
हे सर्व करताना त्या मुलांचे आई वडील कोरोना पॉझिटीव्ह आहेत हे माहिती असूनही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सरपंच या नात्याने व लहान मुलांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आपले कर्तव्य बजावले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी अयवळे