नवी दिल्ली: भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुरु होणारा कसोटी सामना आता दिवस- रात्र खेळवला जाणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच असा कसोटी सामना होत असल्याने या सामन्याचे सर्वानाच आकर्षण असणार आहे. हा सामना कोलकता येथील इडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
या स्टेडियमची क्षमता ६८ हजार आहे. भारतातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ईडन गार्डन्सचे नाव घेतले जाते. पण आता पहिल्याच दिवस-रात्र कसोटीला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
हा सामना दिवस-रात्र असल्यामुळे या लढतीच्या तिकीटी महाग असतील, असे चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याच्या तिकिटांचे दर किती ठेवले आहेत, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. या सामान्यांसाठी ५० रुपयांपासून तिकीट दर लागू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.