भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत सध्या चिंतेचं वातावरण आहे. ८४ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले माजी राष्ट्रपती दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतायत. १० ऑगस्टला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं.आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं ट्विट त्यांनी स्वतः केलं होतं. आणि आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होत. कोरोनाची लागण झालेलीच असतानाच तपासणी दरम्यान त्यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी जमल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये समजल्यानं त्यांची तात्काळ ब्रेन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रेन सर्जरी यशस्वी झाली मात्र त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं. ११ ऑगस्टपासून ते व्हेंटिलेटरवर असून ताज्या सध्या ते कोमात आहेत. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळेच सर्वत्र चिंता व्यक्त होतेय.
काही वृत्तवाहिन्यांनी त्यांचं निधनाची खोटी बातमी दिल्यानं सोशल मीडियावरही त्यांचं निधन झालं असल्याची अफवा पसरली. मात्र त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करून नाराजी या अफवेबाबत नाराजी व्यक्त केली आणि लिहिलं कि, ”माझे वडील प्रणव मुखर्जी सुखरुप आहेत, त्यांच्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते आजारी आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.” माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास अनेक घटनांनी महत्वपूर्ण होता. त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
परिचय आणि पार्श्वभूमी:
प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील किर्नहार शहरालगत मिराटी गावच्या ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक प्रतिष्ठित स्वतंत्र सैनिक आणि काँग्रेस नेते होते. त्यामुळे राजकारणाचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळाला. प्रणब मुखर्जी यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली तसेच कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. काही वर्षे त्यांनी वकीली आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून काम केले आणि नंतर पत्रकार म्हणूनही काम केले. प्रणव मुखर्जी हे बंगीय साहित्य परिषदेचे विश्वस्त व अखिल भारतीय बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते.
राजकीय जीवन:
संसदीय राजकारणात हे १९६७ मध्ये सक्रिय झाले. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते राज्यसभेचे खासदार झाले. त्यानंतर १९७५,१९८१, १९९३ आणि १९९९ मध्ये ते पुन्हा निवडून आले. १९७३ मध्ये औद्योगिक विकास विभागाचे केंद्रीय उपमंत्री म्हणून मंत्रिमंडळातत्यांनी स्थान मिळवले. १९८२ ते १९८४ या काळात मंत्रिमंडळातील अनेक पदावर ते निवडले गेले आणि १९८४ मध्ये ते भारताचे अर्थमंत्री झाले. या काळात युरोमनी मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात त्यांना जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणून संबोधले गेले.
काँगेसमधून बरखास्ती आणि नव्या पक्षाची घोषणा:
३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर प्रणब मुखर्जी यांना स्वतः पंतप्रधान होण्याची इच्छा होती. मात्र राजीव गांधींशी असलेल्या वादामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांत राजीवगांधींच्या समर्थकांच्या षडयंत्रात ते बळी पडले आणि त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात मिळाला नाही. त्यांना काही काळ कॉंग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. त्या काळात त्यांनी स्वतःचा ‘राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस’ हा राजकीय पक्ष स्थापन केला. परंतु १९८९ मध्ये राजीव गांधी यांच्याशी झालेल्या बातचीतनंतर त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन केला.
राजकारणाला नवसंजीवनी:
प्रणब मुखर्जींच्या राजकारणाला नवसंजीवनी मिळाली ती तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह यांच्या रूपाने, जेव्हा पी.व्ही. नरसिंह राव यांनी प्रणब मुखर्जींना नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि नंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. १९९५ ते १९९६ या काळात राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी प्रथमच परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिले. १९९७ मध्ये सर्वोत्तम सांसद म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
काँग्रेमधील त्यांचे स्थान:
जेव्हा सोनिया गांधींनी राजकारणात पाऊल ठेवले तेव्हा प्रणव त्यांच्या प्रमुख मार्गदर्शकांपैकी एक होते. कठीण काळात इंदिरा गांधी कशाप्रकारे निर्णय घेत असत हे प्रणब मुखर्जी सोनिया गांधींना सांगत असे. मुखर्जी यांच्या अतूट निष्ठा आणि कर्तृत्वामुळे ते यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अधिक जवळ आले आणि म्हणूनच २००४ मध्ये जेव्हा कॉंग्रेस पक्षाची सत्ता आली, तेव्हा त्यांना भारताचे संरक्षणमंत्री म्हणून नेमण्यात आले.
सर्वोच्च संविधानिक पद:
प्रणब मुखर्जीं हे सरकार आणि संसदेत ५० वर्षांपेक्षा जास्त काळ अनुभव असणारे दिग्गज नेते ठरले. त्यामुळे त्यांच्या एकूणच राजकीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे २५ जुलै २०१२ रोजी देशाचे सर्वोच्च संविधानिक पद आणि देशाचे पहिले नागरिक म्हणून सन्मान असलेल्या राष्ट्रपती पदाचा कारभार स्वीकारत ते भारताचे १३ वे राष्ट्रपती झाले.
सर्वोच्च नागरिक सन्मान:
२५ जुलै २०१७ ला त्यांनी आपल्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर ते सामाजिक आणि राजकीय जीवनात फारसे सक्रिय राहिले नाही. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारनं ८ ऑगस्ट २०१९ साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. राष्ट्रपती भवन येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करून सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रणब मुखर्जींना सर्वोच्च नागरी सन्मानाचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री, नेते आणि मान्यवर उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपल्या सामाजिक राजकीय जीवनात दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीने देशात चिंतेचे वातावरण आहे. मात्र ते लवकरच बरे होतील अशी आपण प्रार्थना करूयात.
न्युज अनकट प्रतिनिधी – अक्षय बैसाणे