नीरा येथे कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी

पुरंदर, दि.१ सप्टेंबर २०२० : पुरंदर तालुक्यात सासवड आणि जेजुरी प्रमाणेच  कोरोनाचे निदान करण्यासाठी नीरा येथे सुद्धा कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्यात यावे. अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब खाटपे यांनी केली आहे. याबाबतचे एक पत्र त्यांनी पुरंदर दौंडचे प्रांताधिकारी यांच्याकडे दिले आहे. त्याचबरोबर याप्रकरणी तातडीने लक्ष घालून हे तपासणी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याकडे ही केली आहे.
नीरा शहरामध्ये २२ जुलै रोजी कोरोनचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरवातीला कोरोनाचा प्रसार मर्यादित होता.मात्र आता शहरात कोरोनाचाा प्रसार झपाट्याने होत आहे.नीरेत आता  कोरोना रुग्णांची संख्या पन्नास झाली आहे. कोरोना झपाट्याने पसरु नये म्हणून त्याचे निदान तातडीने होणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात असणारे दोन तपासणी केंद्रे नीरा पासून खूपच लांब आहेत. त्यामुळे तपासणीसाठी जाताना लोकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर तपासणीसाठी विलंब होत असल्याने पॉझिटिव रुग्णांचे निदान उशिरा होत आहे.त्यामुळे दरम्यानच्या काळात घरातील व इतर लोकांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नीरा येथे  रॅपिड अँटिजंट किट मार्फत कोरोना तपासणी केंद्र सुरू केल्यास कोरोनाचे तातडीने निदान होऊन कोरोनाला अटकाव घालणे शक्य होईल. यासाठी हे तपासणी केंद्र नीरा येथे सुरू करावे अशी मागणी खाटपे यांनी केली आहे.
नीरा शहराला लागूनच गुळूंचे राख, जेऊर, मांडकी, लपतळवाडी, पिंपरे,वाल्हा, वागदरवाडी, सुकलवाडी, पिंगोरी ही गावे आहेत. या गावांमधून सुद्धा आता कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. असे झाल्यास या भागातील लोकांना सोयीचे होणार आहे. त्याचबरोबर लवकर निदान झाल्याने कोरोना रुग्णांची संख्याही झटपट कमी होईल. त्यामुळे  पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी याबाबत पुढाकार घेऊन प्रशासनामार्फत इथे कोरोना तपासणी केंद्र सुरु करावे अशी मागणी भैय्यासाहेब खाटपे यांनी केली आहे. लोकांमधून सुद्धा अशीच मागणी होत असून हे केंद्र नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करावे म्हणून या भागातील लोक आग्रही आहेत.‌
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा