नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२०: भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी आज पदभार स्विकारला. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्याबरोबर निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार कार्यरत राहणार आहेत.
राजीव कुमार यांचा जन्म १९ फेब्रुवारी,१९६० रोजी झाला असून ते भारतीय प्रशासनिक सेवेमधील १९८४ च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी ३६ वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली असून, आपल्या कार्यकाळामध्ये राजीव कुमार यांनी केंद्राबरोबरच बिहार, झारखंड या गृहराज्यामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये कार्य केले.
राजीव कुमार यांनी बी.एससी, एलएलबी, पीजीडीएम आणि सार्वजनिक नीती याविषयामध्ये एम. ए. केले आहे. त्याचबरोबर त्यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मनुष्य बळ विकास, वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रामध्ये कामाचा व्यापक अनुभव आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामामध्ये अधिक पारदर्शकता आणणे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सेवा-सुविधा पोहोचवणे, यामध्ये येणा-या मध्यस्थांना टाळून व्यवस्थेमध्ये धोरणात्मक संशोधन करून परिवर्तन घडवून आणण्याविषयी राजीव कुमार कटिबद्ध आहेत.
राजीव कुमार सरकारचे वित्त सचिव म्हणून फेब्रुवारी २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एप्रिल २०२० पासून सार्वजनिक उद्योग निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या पदावर ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत कार्यरत होते. राजीव कुमार यांनी सन २०१५-१७ या काळामध्ये कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामध्ये आस्थापना अधिकारी म्हणून काम केले. त्यापूर्वी ते व्यव विभागाचे संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते. तसेच राजीव कुमार यांनी आदिवासी कार्य मंत्रालय आणि पर्यावरण आणि वन मंत्रालय त्याचबरोबर राज्यामध्ये शिक्षण विभागामध्ये कार्य केले आहे. राजीव कुमार यांना गिर्यारोहणाचा छंद आहे त्याचबरोबर भारतीय शास्त्रीय आणि भक्तीसंगीताची त्यांना आवड आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी