मुंबई, दि. ३ सप्टेंबर २०२०: केंद्र सरकारनं २ सप्टेंबरला लोकप्रिय व्हिडीओ गेम “PUBG” सह अन्य ११८ चायनीज ॲप्सवर बंदी आणली. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणि भारताच्या अखंडतेला धोका म्हणून सरकारनं या ॲप्सवर बंदी आणली. मात्र सरकारच्या या निर्णयानं अनेक गेम लव्हर्स नाराज झाले आहेत. असाच एक नाराज झालेला ”चिमुकला गेमर” सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. काय केलंत गं त्या “पबजीनी? असा प्रश्न तो आपल्या आईला विचारताना दिसतोय. मात्र त्याचा हाच निरागसपणा लोकांना स्मित हास्य करायला भाग पाडतोय.
२२ सेकंदांच्या या व्हिडिओत एक शाळकरी मुलगा ”पबजी” गेमवर आणलेल्या बंदीमुळे चांगलाच नाराज दिसतोय. काहीसा दुःखी चेहरा आणि पाणावलेले डोळे असा हा शाळकरी मुलगा आपल्या आईला उद्देशून विचारतोय कि, काय केलंत गं त्या “पबजीनी”? उगाचं बॅन केलं…यावर आई म्हणते बरं झालं केलं. मग आधीच वैतागलेला हा गेम लव्हर आपल्या आईला म्हणतो, मम्मी तू शांत बस्स! इथं परिस्थिती काये, आधी काय बघत होतो का? हिचं इंस्टा कर ना बंद… काय गं तुला आतापासूनच पाहिजे इंस्टा? हे वाक्य कदाचित तो आपल्या बहिणीला बोलता असावा असं वाटतं. शेवटी पुन्हा तो काय केलंत गं त्या “पबजीनी? असं विचारत किती गाडीच्या स्कीम भेटल्या होत्या असं म्हणतो आणि हा व्हिडीओ अर्ध्यातच संपतो. मात्र या केवळ २२ सेकंदांच्या व्हिडिओतून अनेकांचं मनोरंजन होऊन चेहऱ्यावर स्मितहास्य येतंय. त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात शेअर केला जातोय.
अल्पवयीन मुलांवर “PUBG” सारखे गेम्स किती प्रभाव टाकतात हे या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. पबजी या गेमचं काहींना इतकं व्यसन होतं कि ही लोक जेवणं, झोपणं यांसारख्या नैसर्गिक क्रिया करणंही विसरत होते. गेम खेळू न दिल्यानं अनेकांनी आत्महत्या आणि हत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्याच असतील. त्यामुळे मोबाईल, संगणक, गेम्स अशा गोष्टींच्या किती आहारी जायचं? याची शिकवण मुलांना आणि सध्या तरुणानंही देण्याची गरज आहे. सध्या भारतात पबजी जरी बंद झाला असला तरी त्यासारखे अनेक गेम्स उपलब्ध आहेत, त्यामुळे पालकांचं आपल्या मुलांकडे लक्ष असणं गरजेचं आहे. मात्र सध्यातरी या व्हिडिओचा आनंद घ्या आणि हसत राहा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.