मुंबई, ९ सप्टेंबर २०२०: मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देत कंगना मुंबईला येत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या कंगनाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तिचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र मुंबईत येण्या आधीपासूनच कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली तसेच पाकिस्तानने देखील म्हटले होते. यावरून सर्वत्रच नाराजी व्यक्त केली जात होती.
याबाबत आज बीएमसी ने कारवाई करत अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेने सकाळी ११ वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. या कारवाईनंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची तुलना राम मंदिराशी करत बीएमसीची तुलना बाबर सोबत केली आहे. बाबरी मज्जिद आणि राम मंदिर याप्रकरणाची उपमा तिने आपल्या कार्यालयात दिली. मुंबईची तुलना पाकिस्तान सोबत करत तिने लोकशाहीचा घात झाला असल्याचे देखील आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आज सकाळी अकरा वाजताच बीएमसीने तिचे कार्यालय पाडण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यावर प्रतिउत्तर देत कंगनाने एक ट्विट केलं ज्यामध्ये ती म्हणाली की, “मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयात पहिला चित्रपट ‘अयोध्या’ जाहीर झाला. माझ्यासाठी ही इमारत नाही, तर एक राम मंदिर आहे, आज बाबर तिथे आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पुन्हा राम मंदिर पाडले जाईल, पण बाबर, हे लक्षात ठेव, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम” असे ट्वीट कंगनाने केले.
नंतर कंगनाने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला. आधीच पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगना अडचणीत आली असताना आता एक पाऊल पुढे जात तिने थेट ‘पाकिस्तान’ म्हटल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर देखील तिने पुन्हा ट्विट करत असे म्हटले आहे की “मी जे म्हटले होते ते चुकीचे नाही. कारण, मुंबईने पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले आहे की मुंबईमध्ये आणि पाक व्याप्त काश्मीर मध्ये कोणताही फरक नाही.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे