हाथरस, ३० सप्टेंबर २०२०: उत्तर प्रदेशातल्या हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी ४ नराधमांनी सामूहिक बलात्कार करत त्यानंतर तिला गंभीर जमखी केले होते. आज या तरुणीनं प्राण सोडले. देशभरातून पीडितेला न्याय मिळावा यासाठी आंदोलनं होत आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही मोठी टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बलात्कार पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहिली. ते आपल्या ट्विटमधून योगी आदित्यनाथ यांना म्हणाले की, उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. योगी आदित्यनाथजी गुन्हेगारांना शासन करा. पण ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. असं म्हणत त्यांनी ”#यूपीकीनिर्भयाकोन्याय_दो” हा हॅशटॅग वापरला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज असल्याचं नेहमीच बोललं जातं. मात्र तरीही योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशात कायदा व सुव्यवस्था योग्य आहे असं वाटतं. सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर कंगना रानौतसह अनेक भाजप नेत्यांनी खासकरून उत्तरप्रदेश, बिहारच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर, बॉलीवूडवर, मुंबई पोलिसांवर चिखलफेक केली होती. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी बनवण्याची घोषणा केली होती. मात्र कायदा – सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार यांचं काय का प्रश्न पडतो. त्यामुळेच ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी लगावला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे