लखनऊ, ३ ऑक्टोंबर २०२०: उत्तरप्रदेशातील हाथरस घटनेत राज्य सरकारनं कडक कारवाई केलीय. आता या प्रकरणातील आरोपींसह पीडितेच्या कुटुंबीयांची देखील पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टदेखील केली जाईल. एसआयटीचा पहिला अहवाल मिळाल्यानंतर सरकारनं हा आदेश दिला आहे. एवढंच नव्हे तर हाथरसचे पोलिस अधीक्षक, डीएसपी आणि संबंधित पोलिस स्टेशन प्रभारी यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
सायंकाळी उशिरा सरकारनं जारी केलेल्या प्रेस नोटद्वारे ही माहिती देण्यात आली. हे प्रथमच होईल जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तपास करणार्या पोलिसांच्या पथकाच्या पॉलीग्राफ आणि नार्को चाचण्या केल्या जातील. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला होता. याच कारणास्तव एसआयटीचा पहिला अहवाल येताच सरकारनं मोठी कारवाई केलीय.
या कारणामुळं होणार नार्को टेस्ट
या प्रकरणात एसआयटी चौकशी करीत आहे. एसआयटी व्यतिरिक्त, उच्च पातळीवर एक आदेश देण्यात आला आहे की, तपास वैज्ञानिक पद्धतीनं केला पाहिजे. म्हणजेच प्रत्यक्षदर्शींच्या निवेदनांव्यतिरिक्त नार्को किंवा पॉलीग्राफ चाचणी करून निवेदनांच्या सत्यतेची चाचणी घेणे आवश्यक आहे. एसआयटी,नं सरकारकडून ही शिफारस केली आहे. त्या आधारे घटनेत सामील असलेल्या सर्वांसाठी नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफी चाचणी घेतली जाईल.
सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात अनेक प्रकारचे व्हिडिओही समोर आले आहेत आणि तथ्य देखील. म्हणूनच, सर्व पुराव्यांबाबत वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे. यामुळंच सरकारनं आरोपी, पीडितेच्या कुटूंबातील सदस्यांची आणि पोलिस तपासणी पथकाच्या सर्व कर्मचार्यांच्या नार्को व पॉलीग्राफ चाचण्यांचे आदेश दिले आहेत.
या अधिका-यांना निलंबित केलं
मुख्यमंत्री योगी यांच्या आदेशावरून हाथरसचे पोलिस अधीक्षक अर्थात एसपी विक्रांत वीर, कार्यक्षेत्र (सीओ) राम शब्द आणि संबंधित पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, एसआय जगेश सिंग यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी हाथरसच्या जिल्हा दंडाधिकारी विरुद्ध कारवाई होऊ शकते अशी बातमी मिळाली होती. परंतु सध्या त्यांचं नाव यादीत नाही.
या संपूर्ण घटनेत हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीणकुमार आणि एसपी विक्रांत वीर यांनी ज्या पद्धतीनं ही कारवाई केली तेव्हापासून त्यांना लक्ष्य केलं गेलं. सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटूंबानं हाथरसचे डीएम प्रवीण कुमार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या कुटूंबियांनी प्रशासनावर धमकी आणि दबाव आणल्याचा आरोप केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे