“पेड टीआरपी” घोटाळ्यात रिपब्लिक टिव्हीचे नाव, यावर संजय राऊत म्हणाले…

मुंबई, ८ ऑक्टोबर २०२०: अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्ही चे हिंदी तसेच इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे नाव पैसे देऊन टीआरपी वाढवण्याच्या प्रकरणात आले आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आज फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी दिली आहे. दरम्यान, पेड टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे नाव आल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले, “मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिक टिव्हीने टीआरपी विकत घेतल्याचा संशय असल्याचं म्हंटल आहे. यापुढे संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये #असत्यमेवजयते असा हॅशटॅगचा वापर करत रिपब्लिक टिव्ही वर निशाणा साधला आहे.

याआधी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आणि त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकरणामध्ये गोस्वामी यांनी केलेल्या पत्रकारितेवरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव ही मांडण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा