मुस्लिम विरोधी गलिच्छ राजकारण उघड्यावर, कोर्टाकडून तबलीगींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली, १६ डिसेंबर २०२०: कोरोनाच्या संकटकाळात देखील काही नेते मंडळींकडून मुस्लीम वर्गाला लक्ष केलं गेलं. इतकेच नाही तर देशात मुस्लिम विरुद्ध हिंदू असं वातावरण देखील तयार केलं गेलं. या काळात सोशल मीडियावर व प्रसारमाध्यमांमध्ये देखील अनेक खोट्या व्हिडिओ दाखवून याचा प्रसार करण्यात आला होता. यासंदर्भात अनेक प्रसारमाध्यम वाहिन्यांना जाहीर माफी देखील मागावी लागली होती. दिल्लीच्या निजामुद्दीन भागात असलेल्या तबलीगी जमात कार्यक्रमात भाग घेणार्‍या ३६ विदेशी नागरिकांना मंगळवारी मोठा दिलासा मिळाला. साकेत कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सर्व ३६ विदेशी नागरिकांवर साथीच्या कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप होता.

मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी अरुण कुमार गर्ग यांनी ३६ परदेशी नागरिकांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केलं. कोर्टानं त्यांच्याविरोधात २४ ऑगस्ट रोजी आयपीसीच्या कलम १८८ आणि २६९ आणि (साथीचा रोग) अधिनियम १८९७ च्या कलम ३ अन्वये आरोप निश्चित केले होते. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ५१ नुसार आरोप लावले गेले. पण, आता या सर्व परदेशीयांना साकेत कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

मुंबई कोर्टातूनही २० तबलीगींची निर्दोष मुक्तता

यापूर्वी मुंबईतील वांद्रे येथील न्यायदंडाधिका कोर्टानं तबलीगी जमातशी संबंधित २० परदेशी नागरिकांची निर्दोष सुटका केली. त्यांच्यावर कोविड -१९ संबंधित सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. या परदेशीयांनी दिल्लीतील तबलीगी जमात कार्यक्रमात भाग घेतला होता. या दरम्यान सुरू असलेला हा कार्यक्रम त्यांनी लपवला व तसेच कोरोना संबंधित नियमांचं त्यांनी उल्लंघन केलं असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.

प्रसारमाध्यमांनी पसरवला खोटा प्रपोगेंडा

मुंबई कोर्टानं असं सांगितलं होतं की, यासंदर्भात मीडिया व प्रसारमाध्यमांनी खोटा प्रपोगेंडा पसरवला होता. मरकस मध्ये आलेल्या विदेशी मुस्लिम नागरिकांना जाणून-बुजून टार्गेट करण्यात आलं होतं. यादरम्यान मुस्लिम विरोधात देशात असं वातावरण तयार केलं गेलं की, कोरोना संसर्ग पसरण्या मागं तबलीगी जबाबदार होते. कोर्टानं तबलीगी नागरिकांविरोधात लावण्यात आलेले सर्व एफआयआर फेटाळून लावले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा