आंबेगाव, १६ डिसेंबर २०२०: आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायत स्थापनेची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पुढील आठवड्यात घोषणा करणार असून सध्याच्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतून मंचर गावास तीन महिन्यांच्या कालावधीकरिता वगळण्याबाबत राज्याच्या नगरविकास खात्यानं राज्य निवडणूक आयोगास कळविल्याची माहिती शिवसेना उपनेते, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देत नागरिकांमधील संभ्रम दूर केला आहे.
मंचर नगरपंचायतीस मंजुरी मिळाल्यानंतर केवळ नगरविकास विभागाकडून घोषणा होणं अपेक्षित आहे. दरम्यान, राज्यात मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांमध्ये मंचर ग्रामपंचायत निवडणुकीचा समावेश झाल्यानं मंचर ग्रामपंचायत निवडणूक होणार की नगरपंचायत होणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आज आढळराव पाटील यांनी शिवसेना शिष्टमंडळासमवेत मंत्रालय मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व मंचरचा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती सांगितली.
यावेळी झालेल्या बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील आठवड्यातच मंचर नगर पंचायतीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केलं. तसंच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमामध्ये मंचरचा समावेश केला असला तरीदेखील नगरविकास खात्यानं राज्य निवडणूक आयोगाला सदर कार्यक्रमातून वगळण्याबाबत कळविल्याचं उपस्थितांना सांगितलं. त्यामुळं मंचर शहराचा नगरपंचायतीचा मार्ग मोकळा झाला असून नगरपंचायतीची केवळ औपचारिकता बाकी आहे.
मंचर नगरपंचायतीस मान्यता मिळाल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब व मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मंचर ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: साईदिप ढोबळे