मुंबई, १० फेब्रुवरी २०२१: गेल्या काही दिवसांपासून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ही देशातील दुसर्या क्रमांकाची तेल कंपनी चर्चेत आहे. ही सरकारी कंपनी सरकारी निर्गुंतवणुकीच्या क्रमवारीत अव्वल आहे. बीपीसीएलच्या विक्रीमुळे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य थोडे सोपे होईल, अशी सरकारची आशा आहे. इतकेच नाही तर या कंपनीच्या विक्रीत कमी अडथळे येण्याची शक्यता आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून १.७५ लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
वास्तविक, कोरोना संकटात बीपीसीएलने जबरदस्त कमाई केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १२० टक्क्यांनी वाढून २,७७७.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी २०१९-२० च्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १,२६०.६ कोटी होता.
जून तिमाहीत बीपीसीएलचा नफा सुमारे २,०७६ कोटी रुपये होता. दुसर्या तिमाहीत नफा २,२४७ कोटी होता. मिळालेल्या माहितीनुसार तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून कंपनीकडे आधीपासून असलेला साठा विकल्यामुळे नफा वाढला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्लीतील पेट्रोल मंगळवारी ८७.३० रुपये आणि डिझेल ७७.४८ रुपयांवर गेले आहे. त्याचप्रमाणे मुंबईत पेट्रोल ९३.८३ रुपये तर डिझेल ८४.३६ रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल ८९.७० रुपये आणि डिझेल ८२.६६ रुपयांनी तर कोलकातामध्ये पेट्रोल ८८.६३ रुपयांनी तर डिझेल ८१.६ रुपयांनी वाढले आहे.
बीपीसीएलसाठी सरकारला तीन बिड मिळाल्या आहेत. खरेदी करण्याच्या शर्यतीत खाणकाम कंपनी वेदान्ताशिवाय, अमेरिकेची दोन खाजगी इक्विटी गुंतवणूकदार कंपन्या अपोलो ग्लोबल मॅनेजमेन्ट आणि आय स्क्वेअर कॅपिटलचे युनिट थिंक गॅस यांचा समावेश आहे. बीपीसीएलची मजबूत बलेंस शीट खरेदीदारांना भुरळ घालत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर -२०२१ पर्यंत बीपीसीएलची निर्गुंतवणूक पूर्ण केली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे