मुंबई, १७ फेब्रुवरी २०२१: १५ तारखेला म्हणजेच परवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केल्यानंतर काल मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉक डाऊन बाबत कडक इशारा दिला आहे. करोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच करोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
याबाबत बैठक होणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले होते. तसेच कोरोना विषयी पुढील निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. त्यानुसार काल उद्धव ठाकरेंनी या बाबत बैठक घेतली. राज्यातील करोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वरिष्ठ अधिकारी आणि कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही महिन्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढली आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथीलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मधल्या काळात करोनाची रुग्णसंख्या घटल्याने जनतेत बेफिकिरी वाढली. त्यातूनच करोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. मुखपट्टी न वापरणे किंवा अन्य नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असा स्पष्ट आदेशही मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे