मुंबई, ४ जून २०२१: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत कमालीची घट झाली. नव्या रुग्णांची संख्याही घटली. तसंच मृत्यूही कमी होऊ लागलं. त्यामुळं कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन खूपच फायदेशीर ठरलं आहे. होणारी रूग्णांची घट पाहता राज्य सरकारनं आता जिल्हानिहाय लॉकडाउन कमी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यासाठी वेगवेगळ्या लेवल ठरवण्यात आल्या आहेत. त्याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची माहिती दिलीय.
• पाच लेव्हल कशा आहेत?
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
• तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये
पहिल्या लेवलमधील जिल्हे
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ
दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार,
तिसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर
चौथ्या लेव्हलमधील जिल्हे
पुणे, रायगड
• पहिल्या लेव्हलमध्ये कोणती मुभा
रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे, ई कॉमर्स सुरू राहिल. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार, बस १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यात येतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे