मुंबई, 13 नोव्हेंबर 2021: त्रिपुरातील कथित घटेनेचे पडसाद महाराष्ट्रातील नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये उमटले असून या तीन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. अमरावती आणि मालेगावमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या घटनांवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
त्रिपुरातील अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रात पडसाद उमटण्याचं, दगडफेक करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात सर्व समाज, धर्म, जातींबद्दल सद्भावना असणारं सरकार आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन ते काय साध्य करणार? त्रिपुरातील परिस्थितीची आम्हालाही चिंता आहे. विशेषत: ईश्यानेकडील सीमेवर जी राज्य आहेत तिथे शांतता राहावी, तिथे कुठल्याही कारणामुळे अस्थिरता नांदू नये, ही आमची भूमिका कायम असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर त्रिपुरातील ठिगण्या महाराष्ट्रात उमटू नयेत. भाजपला देशभरात अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण करुन 2024 च्या निवडणुकीत उतरायचं आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केलाय.
दरम्यान, राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी या राज्यात घडलेल्या घटनेवर भूमिक स्पष्ट केली आहे. सरकारने या घटनेची गांभिर्याने दखल घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही समाजकंटक राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण पोलिसांना दिले असल्याचे ते म्हणाले. राज्यातील काही भागांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे कळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याचेही ते म्हणाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून समाजकंटकांवर कारवाईही सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे