नवी दिल्ली, 10 जानेवारी 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्यमंत्री, गृहमंत्री, गृह सचिव, कॅबिनेट सचिवांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. बैठकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमिक्रॉन प्रकारांमुळे कोविडची वाढती प्रकरणं पाहता तयारीवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.
त्यांनी देशातील साथीची परिस्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सबाबत सुरू असलेली तयारी, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती आणि नवीन कोविड-19 प्रकार ओमिक्रॉनचं मूल्यांकन यावर विशेष भर दिला. आरोग्य सचिवांद्वारे सध्या जागतिक स्तरावर नोंदवल्या जाणार्या रुग्णांच्या वाढीचा तपशीलवार अहवाल देखील बैठकीत सादर करण्यात आला.
जिल्हास्तरावर तयारीची खात्री करण्यास सांगितलं
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आढावा बैठकीदरम्यान पीएम मोदींनी जिल्हा स्तरावर आरोग्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत राज्यांशी समन्वय राखण्यास सांगितलं. मिशन मोडमध्ये किशोरवयीन मुलांसाठी लस मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलं. ज्या झोनमध्ये अधिक प्रकरणे आढळून येत आहेत तेथे सखोल प्रतिबंध आणि सक्रिय पाळत ठेवणं सुरू ठेवावे आणि सध्या उच्च प्रकरणे नोंदवणाऱ्या राज्यांना आवश्यक तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यात यावं, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी लवकरच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतील आणि कोरोनाच्या परिस्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा उद्रेक
देशाच्या संसदेपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोविड-19 महामारीचा उद्रेक होताना दिसत असताना पंतप्रधान मोदींनी ही बैठक घेतली आहे. दोन्ही सर्वोच्च संस्थांचे शेकडो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 1,59,632 नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत, जी गेल्या 224 दिवसांतील सर्वाधिक दैनंदिन प्रकरणं आहेत.
देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5,90,611 वर पोहोचली आहे, जी सुमारे 197 दिवसांतील सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासांत देशात 327 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4,83,790 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनच्या 3,623 प्रकरणांपैकी, 1,409 लोक एकतर देशाबाहेर स्थलांतरित झाले आहेत किंवा बरे झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे