मुंबई, 24 जानेवारी 2022: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युतीवरून भाजपवर निशाणा साधलाय. शिवसेनेने भाजपशी युती करून 25 वर्षे वाया घालवली, असं मला वाटतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षाचे संस्थापक आणि त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव म्हणाले की, भाजपचं हिंदुत्व सत्तेसाठी आहे.
शिवसेनेने हिंदुत्व नव्हे तर भाजप सोडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपचं संधिसाधू हिंदुत्व हे सत्तेसाठी आहे असं माझं मत आहे. खरं तर, 2019 च्या महाराष्ट्र निवडणुकीनंतर, शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली आणि महाविकास आघाडी (MVA) सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केली.
अमित शहा यांच्यावरही टीका
उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शहा यांनी पुण्यात येऊन हिंमत असेल तर एकट्याने लढा, असं आव्हान दिलं होतं. आम्ही एकटे लढायला तयार आहोत पण माझी अट आहे की तुम्ही तुमची शक्ती सरकारच्या रुपात वापरू नका. तसेच आम्ही आमची शक्ती वापरणार नाही. दोन राजकीय पक्ष म्हणून लढूया. मग बघू कोण जास्त ताकदवान आहे. ईडी, इन्कम टॅक्स वापरणं आणि नंतर भांडणं करणौ योग्य नाही.
युज अँड थ्रो हे भाजपचं तत्व
ठाकरे म्हणाले, ‘यूज अँड थ्रो पॉलिसी हे भाजपचं तत्व आहे, ते दिवस आठवा, जेव्हा निवडणुकीत भाजप उमेदवारांची अनामत रक्कम गमवावी लागत असे. त्यावेळी त्यांना आमची गरज होती, त्यांनी आमच्याशी, अकाली दल आणि ममता यांच्याशी युती केली आणि अटलबिहारी वाजपेयींनी केंद्रात सरकार स्थापन केलं. आम्ही त्याला मनापासून साथ दिली. पण आता हे नवहिंदुत्ववादी हिंदुत्वाचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमात ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री नसते तर केंद्र सरकारने राज्य सरकारला लकवा मारला असता, असं संजय राऊत म्हणाले. आम्हाला आमचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे, ही लढत सोपी नाही. असं त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे