राष्ट्रपती निवडणूक 2022: शरद पवारांनंतर आता फारुख अब्दुल्लाही मागं, काय आहे कारण ?

पुणे, 19 जून 2022: 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या दोन नेत्यांनी रिंगणात उतरण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही नाखुषी व्यक्त केलीय. फारुख अब्दुल्ला यांच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी नाव पुढं केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि ज्या नेत्यांनी पाठिंबा देण्याचे वचन दिलं आहे त्यांचे आभार मानले आहेत.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘यावर बराच विचार केल्यानंतर, मला विश्वास आहे की जम्मू-काश्मीर सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, ज्याला सामोरे जाण्यासाठी माझ्या मदतीची आवश्यकता आहे. म्हणूनच या आदराने मी माझे नाव मागे घेत आहे. मी ममता दीदींचा आभारी आहे की त्यांनी माझं नाव सुचवलं आणि ज्या नेत्यांनी मला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिलं.

15 जून रोजी टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत फारुख अब्दुल्ला, गोपाळ कृष्ण गांधी आणि एनके प्रेमचंद्रन यांच्या नावावरही चर्चा झालीय. खरं तर, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार शोधण्याबरोबरच, एनडीएशी स्पर्धा करण्यासाठी विरोधकांना लक्षणीय मतं मिळवावी लागतात.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची गणिते पाहिली तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी किमान 5,43,216 मतांची आवश्यकता असेल. लोकसभेच्या 543 आणि राज्यसभेच्या 233 सदस्यांच्या मतांचे मूल्य 543200 आहे. सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांच्या एकूण मतांचे मूल्य 543231 आहे. म्हणजेच, संसद सदस्य आणि सर्व विधानसभेतील सदस्यांच्या एकूण मतांचं मूल्य 1086431 आहे.

देशाच्या सध्याच्या राजकारणात एनडीए आणि यूपीए या दोनच आघाड्या अस्तित्वात आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, एनडीएकडं सुमारे 48 टक्के मते आहेत आणि त्यांच्या उमेदवाराला विजयासाठी 10 हजारांहून अधिक मतांची आवश्यकता आहे. त्याच वेळी, यूपीएकडे जवळपास 23 टक्के मतं आहेत. संयुक्त विरोधी पक्षाचे बोलायचे झाले तर त्याला 51 टक्के मते मिळतात.

पण सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील, ही सध्या तरी दूरची ओरड दिसते आहे. 2017 मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बिजू जनता दल आणि YSR काँग्रेसने NDA उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं होतं. यावेळीही भाजप या दोन्ही पक्षांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून उमेदवारांची नावं समोर येत असली तरी एनडीएकडून अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. एनडीएमध्ये समाविष्ट झालेला भाजप काही धक्कादायक नाव पुढे करू शकतो, असं मानलं जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा