दिल्ली २६ जुलै २०२२: एडस् हा असाध्य रोग असून या रोगाने ग्रस्त रुग्णांनी नुकतेच दिल्लीत आंदोलन केले. दिल्लीतल्या राष्ट्रीय एडस् संघटनेच्या कार्यालयाबाहेर या रुग्णांनी आंदोलन केलं. गेले पाच महिने या रुग्णांना औषधे मिळाली नाहीत. त्यामुळे त्रस्त रुग्णांनी आज अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
दिल्ली आणि त्याच्या आसपासमधील पाच राज्यांना अँन्टीव्हायरल औषधे मिळाली नाहीत. जर आम्हाला औषधेच मिळाली नाहीत, तर भारत HIV मुक्त कसा होणार, असा सवाल एका रुग्णाने विचारला आहे. आम्ही संबंधित कार्यालयाला या संदर्भात पत्र लिहीले असून, त्यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने आम्ही अखेर आंदोलनाचा पर्याय निवडला असल्याचं रुग्णांनी नमूद केलं.
दिल्ली नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पिपलचे प्रमुख हरिशंकर सिंह यांनी सांगितले की, आम्ही जोपर्यंत औषधे मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार आहोत. राष्ट्रीय एडस् नियंत्रण संघटनेने ठोस पाऊल उचलावे, यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याचे त्यांनी नमूद केले. कित्येक रुग्ण हे २०१३ पासून अँन्टीव्हायरल औषधे घेत आहेत. पण ते न मिळाल्याने त्यांची स्थिती खालावत आहे.
मागच्या दहा वर्षात १७ लाखापेक्षा जास्त लोक एडसने त्रस्त आहेत. पण तरीही प्रशासन कुठलेच पाऊल उचलत नाही. दिल्लीत जर ही परिस्थिती आहे, तर गावात काय हालात असतील, याचा अंदाज लावणं अशक्य आहे.
त्यामुळे आता प्रशासनानं जागं होण्याची गरज आहे. हीच वस्तुस्थिती म्हणावी लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस