कोल्हापूर, १९ ऑगस्ट २०२२: कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थापनेला पन्नास वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीही येथील महानगरपालिका हद्द वाढीचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने पुन्हा एकदा महानगरपालिकेला हद्द वाढीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता तरी कोल्हापूर महानगरपालिकेला हद्द वाढीचा मुहूर्त मिळणार? याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महानगरपालिका हद्द वाढीचा प्रस्ताव मागवून घेण्यात आला होता, परंतु नगर विकास खात्याने पुन्हा एकदा याबाबत माहिती मागविल्याने हद्द वाढीच्या चर्चेने जोर धरला आहे. पण सर्वांच्या एकत्रित इच्छाशक्तीतून अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
नगर व विकास विभागाने २०१७ पासून आज पर्यंत महानगरपालिका कार्यक्षेत्रात हद्द वाढ झाली असल्यास किंवा हद्दवाढ झालेल्या शहरांचे पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर झाले असेल तर त्याबाबतची माहिती, त्याचबरोबर २०१७ प्रमाणे एकूण निर्वाचित सदस्यांची संख्या याची माहिती तत्काळ पाठवण्यास सांगितली आहे.
महापालिका प्रशासनाकडून २०१३ ते २०२१ पर्यंत चार वेळा प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. महापालिकेने १७ गावांचा समावेश करून राज्य शासनाकडे २०१४ मध्ये प्रस्ताव सादर केला होता. परंतु राज्य सरकारकडून २०१७ साली ४२ गावांचा समावेश करून प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे हद्दवाढिचा मुद्दा पुन्हा थांबला होता.त्यावर २०२१ मध्ये महापालिकेने नव्याने प्रस्ताव सादर केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर