पुणे, १ सप्टेंबर २०२२: आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी दोन सामने होऊ शकतात. हे दोन सामने होण्याचे कारण म्हणजे स्पर्धेत तशी समीकरणं तयार झाली आहेत. भारत आणि पाक यांच्यात कशी आणि कधी लढती होऊ शकतात ते जाणून घेऊयात…
यावर्षी आशिया चषक स्पर्धेत महत्वाचे बदल करण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी दोन गट बनवण्यात आले आहे. या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला एकमेकांबरोबर खेळण्याची संधी मिळेल. या साखळी फेरीनंतर सुपर-४ ही फेरी खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा कसा होऊ शकतो, जाणून घ्या…
आशिया कपमध्ये ६ संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, हाँगकाँग आहे तर ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ आहेत. ग्रुप ए मध्ये भारत सध्या अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तान दुसऱ्या तर हाँगकाँग अखेरच्या स्थानावर आहे. भारत आणि पाकिस्तानची ग्रुप फेरीतील लढत हाँगकाँगविरुद्ध असेल. दोन्ही संघांनी हाँगकाँगविरुद्धची लढत जिंकली आणि ग्रुपमध्ये काही उटलफेर झाला नाही तर चित्र स्पष्ट आहे. ग्रुपमध्ये भारत अव्वल तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर असेल.पण जर हाँगकाँगने पाकिस्तानला धक्का दिला तर मात्र पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. त्यामुळे आता सर्व समीकरण हे पाकिस्तानच्या सामन्यावर अवलंबून असेल. त्यामुळे आता या सामन्यात काय घडतं, हे सर्वात महत्वाचं असेल आणि त्याची सर्वांना उत्सुकता असेल. त्यामुळे या सर्व सामन्यांवर चाहत्यांचे लक्ष असेल.
भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला होता
आशिया कपच्या पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. २८ ऑगस्ट रोजी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १४७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ४३ धावा केल्या, प्रत्युत्तर म्हणून भारताने शेवटच्या षटकात विजय मिळवला आणि पाकिस्तानचा पाच विकेट्स राखून पराभव केला. भारतासाठी, अष्टपैलू हार्दिक पंड्याने चांगली कामगिरी केली, त्याने प्रथम तीन बळी घेतले आणि नंतर १७ चेंडूत ३३ धावा केल्या. हार्दिकने अखेर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला आणि टीम इंडियाचा हिरो म्हणून उदयास आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव