सातारा, १० नोव्हेंबर २०२२ : प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीजवळील अनाधिकृत बांधकाम आज पहाटे जिल्हा प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. या कारवाई वेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांकडून या कारवाईची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातुन पोलीस कुमक मागवण्यात आली होती. या कारवाईमुळं शिवप्रेमींच्या लढ्याला यश मिळालंय.
प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाची कबर आहे. ही कबर सुरुवातीला छोट्या जागेमध्ये होती. नंतर येथील वनविभागाच्या एकरभर जागेत अतिक्रमण करण्यात आलं. त्यामुळं येथे अफजलखानाचं उदात्तीकरण केलं जात असल्याची तक्रार स्थानिकांच्याकडून करण्यात आली होती. हे अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलनही केलं होतं.
पुढं हा वाद कोर्टामध्ये गेला होता. याप्रकरणी दाखल याचिकांवर निकाल देताना मुंबई हायकोर्टानं १५ ऑक्टोबर २००८ आणि ११ नोव्हेंबर २००९ रोजी बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. या निकालाला पुढं सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने ही हायकोर्टाचे आदेश कायम ठेवत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले.
बांधकाम पाडण्याचे आदेश असतानाही स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नव्हते. आज अखेर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाईत कबरी जवळील बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात केली. या कारवाईची पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. आज (गुरुवारी) शिवप्रताप दिनाची पहाट होताच ही कारवाई सुरू करण्यात आली.
या कारवाईची पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्यांची चौकशी करण्यात येत आहे. यामुळं प्रतापगड पासून चार किलोमीटर परिसरामध्ये संचारबंदी सदृश स्वरूप आलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर