पुणे, २२ डिसेंबर २०२२ : हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे. याआधी हडपसर परिसरात कोयता गॅंगच्या उच्छादाने नागरिक त्रासले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना जे दिसतं ते स्थानिक पोलिसांना दिसत नाही का? असा प्रश्न विचारला गेला आहे. गेले दोन दिवस गुन्हे शाखेचे पोलिस अवैध धंद्यांवर कारवाई करीत आहेत. याआधी हडपसर परिसरात कोयता गॅंग आणि गुन्हेगारांनी धुमाकूळ घातल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस स्टेशनवर मोर्चाही काढला होता.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कोयता गॅंगचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही विधिमंडळ अधिवेशनात हडपसर परिसरातील कोयता गॅंगचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे पोलिसांनी हडपसर परिसरात रूट मार्च काढला होता. तर दुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकाने हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या भागांत गुन्हेगारांची झडती घेण्यासही सुरवात केली होती. हडपसर परिसरातील मंत्री मार्केटजवळ सुरू असणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या १६ जणांना ताब्यात घेतले, तर काही हजारांचा मुद्देमालही जप्त केला.
त्याच्याच दुसऱ्या दिवशी सामाजिक सुरक्षा विभागाने पुणे- सोलापूर रस्त्यावरील एका लॉजवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. त्या ठिकाणाहून तीन मुलींची सुटका करण्यात आली. तर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोन दलालांवर गुन्हा दाखल केला गेला. हे सारे करून देखील हडपसर पोलिस स्टेशनचा गुन्ह्यांच्या बाबतीत वरचा क्रमांक लागतो. मोबाईल हिसकावणे, पादचाऱ्यांना लुबाडणे, घरफोड्या यांसारख्या घटना या परिसरात सतत घडताना दिसतात. त्यामुळे कारवाई करण्यात किंवा शोध घेण्यात हडपसर पोलिस कमी पडत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे