नाशिककर हैराण; थंडीपासून बचावासाठी ऊबदार कपड्यांची मदत अन् शेकोट्या पेटविण्यावर भर
नाशिक, ता. २५ डिसेंबर २०२२ : उत्तरेकडील थंड वार्यांमुळे जिल्ह्याच्या तापमानात घसरण झाली आहे. निफाडचा पारा शनिवारी (ता. २४) ७.८ अंशांपर्यंत घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे. नाशिकलाही पार्यात कमालीची घट झाल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामध्येच हिमालयीन भागातील बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणार्या शीतलहरींचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील हवामानावर झाला असून, पार्यात लक्षणीय घसरण झाली आहे. नाशिकचा पारा पुन्हा एकदा १०.८ अंशांपर्यंत खाली आला आहे. परिणामी शहर, परिसरातील गारठ्यात वाढ झाली आहे. दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी शहरावर धुक्याची चादर पसरत आहे. रात्रीही थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यातच शनिवारी (ता. २४) दिवसभर हवेत गारवा असल्याने नाशिककर हैराण झाले. थंडीपासून बचावासाठी ऊबदार कपड्यांची मदत घेतली जात असून, ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.
थंडीने द्राक्षबागा धोक्यात येण्याची भीती असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत. द्राक्षपीक वाचविण्यासाठी पहाटेच्या वेळी बागांमध्ये धूरफवारणी केली जात आहे. उर्वरित जिल्ह्यातही थंडीचा जोर जाणवत आहे. वातावरणात झालेला हा बदल गहू-हरभरा पिकांसाठी फायदेशीर असला, तरी अन्य पिकांसाठी ते नुकसानकारक असल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांमध्ये तापमानाच्या पार्यातील चढ-उतारासह थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील