गुजरातमध्ये लक्झरी बस-कारच्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू, ३२ जखमी

पुणे, ३१ डिसेंबर २०२२ : देशभरात अपघातांची मालिका सुरू असून, गुजरातच्या नवसारीमध्ये लक्झरी बस आणि फॉर्च्युनर कारच्या धडकेत ९ जणांचा मृत्यू झाला तर ३२ प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाहून एकमेकांत अडकलेली वाहने बाजूला केली आहेत; तसेच जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

लक्झरी बस अहमदाबादहून वलसाडला जात होती. वेसवा गावाजवळ पोचताच राष्ट्रीय मार्गावर समोरून फॉर्च्युनर कार आदळली. अपघात एवढा भीषण होता, की फॉर्च्युनर कारचा चुराडा झाला. मोठमोठ्याने किंचाळणे आणि आरडाओरडा सुरू झाल्याने गावातील ग्रामस्थ जागे झाले आणि घटनास्थळी धावले. यानंतर पोलिसांनाही बोलाविण्यात आले व बचावकार्य सुरू झाले.

फॉर्च्युनरमध्ये अडकलेल्या व बसमधील जखमींना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी ९ जणांना मृत घोषित केले. सर्व मृत कारमधील होते. फॉर्च्युनर कार डिव्हायडर ओलांडून पलीकडच्या साईडला आली होती. यामुळे समोरून येणाऱ्या बसवर आदळली असे सांगितले जात आहे.

या अपघातात ३२ जण जखमीही झाले आहेत. ३२ जखमींपैकी १७ जणांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी वलसाडला रेफर केले. एका जखमीला सुरतला पाठविण्यात आले आहे. अन्य १४ जखमींवर नवसारी येथेच उपचार सुरू आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा