पोलिस भरतीकरिता आलेल्या दोन उमेदवारांकडे सापडली औषधी द्रव्ये

अलिबाग, ९ जानेवारी २०२३ : पोलिस भरती प्रकियेच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे औषधी द्रव्ये सापडली. यातील एका उमेदवाची मैदाणी चाचणी झाली आहे. तर दुसऱ्या उमेदवाराची चाचणी आज होणार होती; मात्र त्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे‌. या उमेदवारांचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत.

त्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अलिबाग पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यास गोपनीय सूत्रांकडून वरसोली नाईक आळी येथील एका कॉटेजमध्ये मैदानी चाचणीकरिता आलेल्या काही उमेदवारांकडे औषधी द्रव्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या कॉटेजमध्ये तिघेजण राहत होते.

पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता एक ग्रे रंगाचे पाऊच आढळून आले. दोन न्यूरोकाइंड गोल्ड इंजेक्शन, नाव नसलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या तीन बंद बाटल्या, पाच ओमेगा व्हीआयटी सीडी टॅबलेट्स, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुई, एका लाल रंगाच्या कॅप्सूलसह औषधी द्रव्ये सापडली आहेत. पुढील तपास अलिबाग पोलिस करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा