‘भोगीची भाजी’, तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, खिचडीचा नैवेद्य दाखवून सर्वत्र भोगी सण उत्साहात

निगडी, १४ जानेवारी २०२३ : पौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत! मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. भोगी ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. ‘भोगी’ शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा होतो. म्हणून या सणाला आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानले जाते.

भोगीची आख्यायिका
भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धरतीवर उदंड पिके पिकावीत म्हणून प्रार्थना केली होती, असे मानतात. ही पिके वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावीत, अशी प्रार्थना आजच्या दिवशी केली जाते.

या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. ‘भोगी’ हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहरलेले असते त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी ‘भोगी’ची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते.

महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला ‘खिंगाट’ म्हणतात. या दिवसांत उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढविणार्‍या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावट्याचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.

ही ‘भोगीची भाजी’, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी असा देवाला खास नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी सासरी असलेल्या मुलींना माहेरी जेवावयास बोलाविले जाते.

थंडीच्या दिवसांत तीळ आणि उष्ण पदार्थ खाल्ले जातात. आपले सण देखील तसेच आहेत ज्या-त्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या आपल्या खाल्ल्या जाव्यात म्हणून त्यांचा समावेश सणांमध्ये देखील करण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या धामधुमीपाठोपाठ येणारा मकर संक्रात हा पहिलाच सण! या दिवसांत भाजीपाला, धनधान्य; तसेच फळांचे मुबलक उत्पन्न होते. निसर्गात ज्याप्रमाणे धनधान्य उपलब्ध असते; तसेच शरीरही या काळात अधिकाधिक अन्न ग्रहण करण्यासाठी तयार असते. नैसर्गिकरीत्या भूक वाढते, पचनशक्ती सुधारते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी पाच भाज्यांची विशेष भाजी आणि तीळ घालून बाजरीची भाकरी केली जाते.

भोगीची भाजी ही वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाणे घालून केली जाते. वांगे हे वातूड असल्याने त्याचा वापर टाळावा, असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे; पण आयुर्वेदानुसार हिवाळ्याच्या दिवसांत वांग्याचे भरीत खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्यास; तसेच कफ कमी करण्यास मदत होते. तीळ आणि शेंगदाणे स्निग्ध असल्याने शरीरातील, त्वचेतील रुक्षपणा कमी करण्यास मदत करतात. यासोबत दूध, तूप, दही, लोणी, ताक यांसारख्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करावे. हिवाळयामध्ये शरीराला ऊब मिळावी व थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून या पदार्थांचाही आहारात समावेश करावा.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा