भारतात संक्रांत सण सर्वदूर मोठ्या उत्साहाने साजरा

निगडी, १५ जानेवारी २०२३ : नववर्षाचा पहिला सण संक्रांत तिळगुळाने साजरा होत आहे. वर्षभर गोड बोलण्याचा, गुण्यागोविंदाने नांंदण्याचा संदेश यानिमित्ताने दिला जाणार आहे. तिळगूळ, वाण व पतंग विक्रेत्यांनी पिंपरी-चिंचवड, निगडी-प्राधिकरण, आकुर्डी, भोसरीसह उपनगरांतील दुकाने सजली आहेत. खरेदीमुळे बाजारात ग्राहकांंचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.

संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. दरवर्षी न चुकता १४ जानेवारीलाच साजरी होणारी संंक्रांत यंदा लीप वर्ष असल्याने रविवारी (ता. १५) साजरी होत आहे. मकर संक्रांतीला संक्रांतदेवीची पूजा केली जाते. हे देवीचे रौद्ररूप आहे. दरवर्षी ही देवी एखाद्या वाहनावर बसून येते. दरवर्षी देवीचे वाहन बदलते असते. यंदाची संक्रांत वाघावर आरूढ आहे. उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. केशराचा टिळा लावला आहे. जाईचे फूल हाती आहे. सर्प जातीची आहे. कुमारिका आहे. तिचे भोजनपात्र चांदीचे असून, तिचे नाव राक्षसी व नक्षत्रनाव मंदाकिनी आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. ईशान्येकडे पाहत आहे, असे पंचागात म्हटले आहे. देवीचे वाहन आणि सोबतच्या वस्तू काही घटनांच्या सूचक मानल्या जातात. देवी ज्या दिशेकडून येते तिथे समृद्धी असते. ती ज्या दिशेकडे पाहते, जाते त्या ठिकाणी संकटे येतात. म्हणूनच एखाद्यावर संक्रांत आली असे म्हटले जात असावे. वास्तविक देव किंवा देवी आपल्या भक्तांवर कधीच संकट आणत नाहीत. त्यांची भक्तांवर नेहमीच कृपा असते.

भारतात हा सण सर्वदूर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पद्धती, रीतीभाती जरी वेगळ्या असल्या तरी आनंद, उत्साह हा एकच असतो. उत्तर भारतात या दिवशी डाळ-भात याची खिचडी बनविली जाते. तिचे दानही केले जाते. याला ‘संक्रांत खिचडी’ असे नाव आहे. बंगालमध्ये काकवीत तीळ घालून ‘तिळुआ’ नावाचा पदार्थ बनवितात. काकवी म्हणजे गुळाचा पाक. महाराष्ट्रात तिळगुळाची पोळी, मुगाची खिचडी असा प्रसाद बनविला जातो. तिळगूळ देऊन आपले स्नेहसंबंध दृढ केले जातात. कदाचित थंड वातावरणामुळे तिळगुळाचा वापर जास्त केला जात असावा. कारण आपल्याकडे येणाऱ्या सणांना ऋतुमानानुसार गोड पदार्थ करण्याची प्रथा आहे. ‘शादी किसकी भी हो अपना दिल गाता है!’ या उक्तीप्रमाणे सण कोणताही असो गोड पदार्थ बनविणे आणि खाणे गरजेचे आहे. तिळगुळाचेसुद्धा अनेक प्रकार बनतात. इंदूरकडे ‘गजक:’ हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळात महिलांना आपली कलाकुसर दाखविण्याची एक उत्तम संधी संक्रांतीच्या निमित्ताने मिळत असे. संक्रांतीचे दागिने हा आणखी एक कलाविष्कार आहे. नवविवाहितेच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिली जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात.

हलव्याचे तयार दागिनेही बाजारात उपलब्ध झाले असून त्यात हार, नेकलेस, कानातले, बिंदी, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, मंगळसूत्र, कानाचे वेल, मुकुट असे अनेक प्रकार आहेत. हल्ली तयार लाडू मिळत असले, तरी घरच्या तिळगुळाच्या लाडूची व तिळपोळीची गोडी कायम आहे. त्यासाठी घरोघरी महिलांची लगबग सुरू झाली आहे. संक्रांतीला काळ्या रंगाच्या वस्त्रांचे महत्त्व असल्याने काळी वस्त्रे खरेदी केली जात आहेत. काळ्या वस्त्रांवर साजेशी ज्वेलरी खरेदी करण्याकडे महिलांचा कल आहे. वाण व पतंग विक्रेत्यांनी पिंपरी-चिंचवडसह उपनगरांतील दुकाने गजबजली आहेत. खरेदीमुळे बाजारात ग्राहकांंचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.

सर्वांत महत्त्वाचे काय तर संक्रांतीच्या पर्वकाळात कठोर बोलू नये, भांडू नये, हा स्नेहवर्धनाचा काळ आहेे. संबंध ताणले गेले असल्यास तिळगूळ देऊन माफ करावे. नात्यातील स्नेह, गोडवा वाढविला जाणार आहे. अर्थात आपल्याजवळचा आनंद वाटायचा. ऋतू बदलणारा निसर्ग देखील आपल्याकडून हीच अपेक्षा करतो. जुनं विसरायचं, नवीन आपलंसं करायचं हाच आनंदी जीवनाचा मूलमंत्र होय.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा