पुणे, २२ जानेवारी २०२३ धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात ३० हजार हिंदू नागरिक सहभागी होणार आहेत.
सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल. यामध्ये आमदार शिवेंद्र राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, ‘तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे.
- मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल
यामध्ये शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे. मोर्चाची सुरुवात झाल्यानंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे : गाडगीळ पुतळ्याकडून जिजामाता चौकाकडे जाणारी वाहने मोर्चा बेलबाग चौकातून मार्गस्थ होईपर्यंत डावीकडे वळून कुंभार वेस चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. सोन्या मारुती चौकातून लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकाकडे जाणारी वाहने फडके हौद चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौकमार्गे टिळक चौकाकडे जाणारी वाहने मोर्चा खंडोजीबाबा चौकात पाेहोचेपर्यंत सेवासदन चौकातून बाजीराव रस्त्याने अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
मोर्चा बेलबाग चौकात आल्यानंतर बाजीराव रस्त्याने येणारी वाहने पूरम चाैकातून टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जातील. मोर्चा टिळक चौकात आल्यानंतर शास्त्री रस्त्याने येणारी वाहने सेनादत्त चौकातून म्हात्रे पूलमार्गे इच्छितस्थळी जातील.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.