हम्पी, ३० जानेवारी २०२३ कर्नाटकात २७ ते २९ जानेवारी दरम्यान हम्पी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात अनेक कलाकारांनी गायन सादर केले. या महोत्सवात प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी देखील गाणी गायली. मात्र, कैलाश खेर यांचे गाणे सुरु असताना दोन तरुणांनी त्याच्यावर बाटली फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळवलेल्या माहितीनुसार, कैलाश खेर स्टेजवर परफॉर्म करत असताना दोन तरुणांनी त्यांना कन्नड गाणे गाण्यास सांगितले. मात्र त्यांनी ते न गायल्याने दोन तरुणांनी त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. रविवारी संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार घडला.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. तसेच कैलाश खेर सुरक्षित असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. मात्र, कर्नाटकमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे कैलाश खेर यांचे चाहते संतापले आहेत.
दरम्यान, तीन दिवस चालणाऱ्या हम्पी उत्सवाची सुरुवात २७ जानेवारी रोजी झाली होती. नवीन विजयनगर जिल्हा तयार झाल्यानंतर पहिल्यांदा याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.