महाराष्ट्रात गोकुळच्या दुधाच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबई, ११ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्रात आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला दूध दरवाढीने कात्री लागणार आहे. दुधाचा सर्वांत मोठा ब्रँड असलेल्या गोकुळने दरात वाढ केली आहे. मुंबईत गायीच्या दुधाचे दर दोन रुपयांनी, तर म्हशीच्या दुधाचे दर ३ रुपयांनी वाढले आहेत. म्हणजेच मुंबईत ५४ रुपये प्रतिलिटर दर असलेले गायीचे दूध आता ५६ रुपयांना मिळणार आहे. तर ६९ रुपये लिटरने मिळणारे म्हशीचे दूध आता ७२ रुपयांना मिळणार आहे.

सध्या गोकुळ कंपनी असलेल्या कोल्हापुरात एक लिटर गोकुळच्या म्हशीचे दूध जे ६४ रुपये प्रतिलिटर मिळत होते, त्याचे दर ६६ रुपयांवर पोचले आहेत. गायीचे दूधही ४८ रुपयांवरून ५० रुपयांवर पोचले आहेत. पुण्यातही दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली आहे. म्हशीचे दूध आता ७० रुपयांऐवजी ७२ रुपये प्रतिलिटर झाले असून, गायीचे दूध ५६ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

यापूर्वी सर्वसाधारण अर्थसंकल्प येताच अमूल ब्रँडच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने सर्व प्रकारच्या अमूल दुधाच्या एक लिटरच्या दरात ३ रुपयांनी वाढ केली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर अमूल फ्रेशचे दूध ५४ रुपये प्रतिलिटर झाले आहे. अमूल गोल्डची किंमत ६६ रुपये प्रतिलिटर, तर अमूलचे गायीचे दूध ५६ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

लवकरच पुण्यातही कात्रज दुधाच्या दरात वाढ होणार आहे. कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अजून घोषणा व्हायची असून, दुधाच्या ब्रँडमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. एका ब्रँडच्या दुधाचे भाव वाढले तर काही दिवसांत सर्व दूध ब्रँड नवे दर लागू करतात. दुधाचे दर वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चारा दरात झालेली वाढ. गेल्या काही दिवसांपासून चाऱ्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दुधाचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम समोर आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा